राज्यात काही ठिकाणी जोरदार परतीचा पाऊस होत आहे. यातच अमरावती जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेला वाचवतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना कॅमऱ्यात कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं –
काल दुपारी अचानक अमरावतीच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. यात अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा येथे कपडे धून्याकरिता गेलेल्या महिला पुरात वाहून जात होत्या. हा खास व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. सुदैवाने महिलांना वाचविण्यात नागरिकांना यश मिळालं आहे. महिलांना पुरातून बाहेर काढतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
परतीचा पाऊस अन् पुण्यातील परिस्थिती –
पुण्यात परतीच्या पावसाने मध्यरात्री अक्षरश: धुमाकुळ घातला होता. यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. पावसाच्या धुमाकुळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पुण्यात गेल्या दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुण्याची ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे.पुण्यामध्ये गेल्याकाही दिवसांमध्ये जो पाऊस पडत आहे. याला काही शास्त्रीय कारणे आणि प्रशासकीय कारणे आहेत. शास्त्रीय कारणांमध्ये वैश्विक कारणे आणि स्थानिक कारणे हे दोन भाग आहेत. वैश्विक कारणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे प्रमाण आणि ढगफुटी प्रमाण वाढले आहे. जी स्थानिक स्वरूपाचे शास्त्रीयकारण आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेकडी फोड करणे आणि झाडे तोडणे हे आहे. त्यामुळे माती मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरायला कुठेच जागा मिळत नाही.