तब्बल नऊशे वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या योगदंडाचा नयनरम्य अक्षता सोहळा शनिवारी लाखो भाविकांनी याचि देही, याचि डोळा अनुभवला. यानिमित्ताने अपूर्व उत्साह आणि शिस्त आणि मंगलमय वातावरणात भक्तिसागर उसळला होता.
बाराव्या शतकात शिवयोगी श्री सिध्देश्वर महाराजांच्या प्रत्यक्ष जीवनात घडलेल्या लग्न सोहळय़ावर आधारित सिध्देश्वर यात्रा साजरी होते. केळवण, देवदेवतांना आमंत्रण तथा आवाहन, हळदकार्य, अक्षता सोहळा आणि शेवटी अग्निप्रदीपन अशा स्वरूपात यात्रा साजरी करण्याची पूर्वापार परंपरा चालत आहे. सिध्देश्वर महाराजांच्या योग आराधनेमुळे प्रभावित होऊन एका कुंभार कुटुंबातील कुमारिकेने त्यांच्याशी लग्न करण्याचा हट्ट केला होता. लग्नाचा हट्ट पाहून सिध्देश्वर महाराजांनी आपल्या योगदंडाशी लग्न करण्यास संमती दिली होती. त्यास कुंभारकन्या राजी झाली आणि त्यानुसार सिध्देश्वर महाराजांच्या योगदंडाशी कुंभारकन्येचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्याची आठवण म्हणून सिध्देश्वर यात्रेत लग्न सोहळय़ाचा विधी प्रतीकात्मक स्वरूपात पार पाडला जातो.
सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाडय़ातून योगदंडाचे प्रतीक असलेले मानाचे सात नंदिध्वज मिरवणुकीने निघाले. अग्रभागी पंचाचार्याच्या पंचरंगी ध्वज होता. सातही नंदिध्वज सिध्देश्वर देवस्थानाच्या मालकीचे आहेत. पहिल्या नंदिध्वजाचे मानकरी हिरेहब्बू तर दुसऱ्या नंदिध्वजाचे मानकरी कसब्यातील देशमुख घराणे आहे. तिसरा नंदिध्वज वीरशैव माळी समाजाचा तर चौथ्या आणि पाचव्या नंदिध्वजांचा मान विश्वब्राह्मण सोनार समाजाचा आहे. तर शेवटच्या सहाव्या आणि सातव्या नंदिध्वजांचा मान मातंग समाजाला दिला जातो. नंदिध्वजांना सुंदर बाशिंग बांधण्यात आले. या मिरवणूक सोहळय़ाला लग्नाच्या वरातीचे स्वरूप आले होते. तीन किलोमीटर अंतराच्या संपूर्ण मिरवणूक मार्गावर संस्कार भारती संस्थेच्या कलावंतांनी रांगोळीच्या पायघडय़ा घातल्या होत्या. दुपारी नंदिध्वज मिरवणूक सोहळा सिध्देश्वर तलावाकाठी संमती कट्टय़ावर पोहोचला. नंतर सिध्देश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजन झाले. कुंभार यांना हारेहब्बू मंडळींनी मानाचा विडा दिला. त्यानंतर धार्मिक विधी पूर्ण होताच सुहास रेवणसिध्द शेटे यांनी संमती मंगल अष्टकांचे वाचन सुरू केले.
ओम सिध्दारामा नम: दिडय़म-दिडय़म, सत्यम-सत्यम, नित्यम-नित्यम असा मंगलाष्टकाचा उच्चार वेळोवेळी होताच लक्षावधी भाविकांचे हात तांदळाच्या अक्षतांचा नंदिध्वजांच्या दिशेने वर्षांव करीत होते. प्रत्येकवेळी सिध्देश्वर महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून जात होते.