महाराष्ट्रातल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच आमदारकीसाठीच्या या निवडणुका होत आहेत. याआधी अंधेरीमध्ये पोटनिवडणूक झाली असली तरी या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली होती, त्यामुळे महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यात थेट सामना झाला नव्हता.
विधानपरिषदेच्या या सामन्यात फक्त नाशिकमध्ये सत्यजीत तांबेंचीच नाही तर अन्य चार ठिकाणीही कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे, पण या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून कोणताच उमेदवार रिंगणात नसणार आहे. या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला निकाल लागणार आहेत.
विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी नाशिक आणि अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघाची तर औरंगाबाद, कोकण आणि नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. यातल्या नाशिकमधल्या लढतीने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ट्विस्ट आला.
नाशिक पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अपक्ष असलेल्या सत्यजीत तांबे यांचा सामना शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्याशी आहे. यातल्या शुभांगी पाटील यांना महाविकासआघाडीने पाठिंबा दिला असला तरी ठाकरे गटामध्येच त्यांना पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले आहेत. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या जागेवर महाविकासआघाडीकडून सुधाकर आडबाले, भाजप पुरस्कृत नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि अपक्ष असलेल्या सतीश इटकेलवार यांच्यात लढत होईल. राष्ट्रवादीचे असलेल्या सतीश इटकेलवार यांना पक्षाने उमेदवारी मागे घ्यायला सांगितलं होतं, पण तरीही ते लढण्यावर ठाम राहिले, म्हणून राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
अमरावतीमध्ये भाजपचे रणजीत पाटील, महाविकासआघाडीचे धीरज लिंगाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकर यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यामध्ये थेट लढत होईल. कोकणामध्ये शेकापचे बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये सामना रंगेल.