मृतांची संख्या १३२ वर, १७७ जणांना वाचवण्यात यश; बचावकार्य अद्यापही सुरु

गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १३२ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. १०० वर्ष झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतून १७७ जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. यातील १९ जणांवर उपचार सुरू असल्याचं गुजरातच्या माहिती विभागानं सांगितलं आहे.

लष्कर, हवाई दलासह नौदलाकडून बचावकार्य

मच्छू नदीवरील पूल कोसळताच तत्काळ तिन्ही सैन्य दलांचे बचावपथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवळपास २०० जवानांकडून हे बचावकार्य राबवलं जात आहे, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. अग्निशमन दलाची सात पथकं, राज्य मदत दलाच्या तीन पथकांसह एनडीआरएफच्या दोन पथकांकडूनही पीडितांचा शोध घेण्यात येत आहे.

या दुर्घटनेतील मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय समितीची स्थापना केली आहे. मोरबीतील दुर्घनाग्रस्त पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. हा पूल वापरायोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिले नव्हते, अशी माहिती आता समोर येत आहे.

घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.