‘‘भारत सौर आणि अंतराळ क्षेत्रात विस्मयजनक कामगिरी करत आहे. या यशामुळे अवघे जग चकित झाले आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आपल्या आकाशवाणीवरील मासिक संवाद सत्रात काढले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतेच ३६ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची मोहीम यशस्वी केली. शास्त्रज्ञ युवकांनी ही देशाला दिलेली विशेष दिवाळी भेट ठरली, असे सांगून मोदी म्हणाले, की या मोहिमेच्या यशामुळे संपूर्ण देशातील संपर्कयंत्रणा अत्याधुनिक आणि वेगवान होण्यास मदत होईल. अतिदुर्गम भागही उर्वरित देशाशी या संपर्कमाध्यमांद्वारे जोडले जातील. आपल्या सरकारने प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मिळालेल्या यशाचे हे बोलके उदाहण आहे. जर देश स्वावलंबी झाला, तर उत्तुंग यशोशिखरे कशी गाठतो, याचेही हे उत्तम उदाहरण आहे. एके काळी भारताला ‘क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान’ देणे विदेशांनी नाकारले होते. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून, या यशाला गवसणी घातली.
२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्यासाठी भारताची वाटचाल सुरू असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की सर्व देशवासीयांच्या प्रयत्नांनी हे लक्ष्य आपण निश्चित साध्य करू. भारतीय उद्योगक्षेत्र व नवउद्यमी क्षेत्र अंतराळ क्षेत्रात नवतंत्रज्ञान आणि नवकल्पना राबवत आहे. ‘इन-स्पेस’च्या सहकार्याने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होत आहे. या संदर्भात विद्यार्थीशक्तीचे योगदान मोठे आहे. ‘हॅकल्थॉन’सारख्या उपक्रमांतून देशातील लाखो प्रतिभावान युवक एकत्र येऊन विविध क्षेत्रांतील आव्हानांवर देशाला तंत्रज्ञानाद्वारे समाधानकारक तोडगा शोधून देत आहेत. १४-१५ ऑक्टोबर रोजी झालेल्या या उपक्रमात देशातील सर्व २३ ‘आयआयटी’ एका छताखाली प्रथमच एकत्र आल्या. या वेळी देशभरातील विद्यार्थी-संशोधकांचे ७५ पेक्षा जास्त सर्वोत्तम प्रकल्पांचे सादरीकरण झाले.
छठपूजेनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सौरऊर्जेच्या प्रभावी उपयोगाद्वारे ‘सूर्यदेवतेचा आशीर्वाद’ भारताला लाभत आहे. आपला देश सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करणाऱ्या देशांपैकी एक अग्रगण्य देश बनला आहे. ‘पंतप्रधान कुसुम योजने’विषयी सांगताना मोदी म्हणाले, की या योजनेच्या लाभार्थ्यांनी केवळ वीजबिल कपात करण्यासाठी सौरऊर्जा संयंत्रे बसवली नाही, तर रोजगारनिर्मिती, उत्पन्नासाठी त्याचा उपयोग करून घेतला. देशातील पहिले सौरगाव असलेल्या गुजरातमधील मोढेरा ग्रामस्थांशी आपण संवाद साधला असून, तेथील बहुसंख्य घरांत सौरऊर्जेचा वापर होतो. भारतात सौरग्राम उभारण्याची मोठी चळवळ लवकरच उभी राहील.