दोन्ही संघांना विजय आवश्यक ; ऑस्ट्रेलियापुढे आर्यलडचे आव्हान

गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि धक्कादायक निकाल नोंदवण्यात सक्षम आर्यलड हे संघ सोमवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत. उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

गट१ मध्ये सहाही संघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून न्यूझीलंडचा संघ पाच गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानासाठी बरीच स्पर्धा आहे. इंग्लंड, आर्यलड आणि ऑस्ट्रेलिया या तीनही संघांचे प्रत्येकी तीन गुण आहेत. त्यामुळे सोमवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि आर्यलड या दोन्ही संघांचे विजयासह निव्वळ धावगती वाढवण्याचे लक्ष असेल.

ब्रिस्बन येथील अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजावे लागू शकेल. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जाते आहे. मात्र, त्यांना या स्पर्धेत आपला सर्वोत्तम खेळ करता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन करताना श्रीलंकेवर मात केली. त्यांचा इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठणे आव्हानात्मक ठरू शकेल. 

दुसरीकडे, आर्यलडने प्राथमिक फेरीचा अडथळा पार केल्यानंतर ‘अव्वल १२’ फेरीत इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला; परंतु त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला, तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, त्यांनाही स्पर्धेत आगेकूच करण्याची संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.