गेल्या आठवडय़ात ट्विटरवर मालकी मिळविलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील अपेक्षित मनुष्यबळ कपातीचा भाग म्हणून एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची योजना आखली जात आहे, असे वृत्त वॉिशग्टन पोस्टह्णने या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांचा हवाला देऊन सोमवारी दिले.
नियामकांकडे सादर केलेल्या विवरणानुसार २०२१ अखेरीस ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या ७,००० पेक्षा जास्त होती. यापैकी एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे जवळपास २,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी शक्यता आहे. मस्क यांनी या आधी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबतच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तथापि, ताज्या घडामोडींवर ट्विटरकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मस्क यांनी सरलेल्या गुरुवारी ४४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात ट्विटरच्या अधिग्रहणाचा व्यवहार पूर्ण केल्यावर, सर्वप्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आणि कायदेशीर व्यवहार व धोरण प्रमुख विजया गड्डे यांना कामावरून कमी करून बाहेरचा रस्ता दाखविला आहे.