कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. मिरज-पंढरपूर महामार्गावर जुनोनी येथे पायी दिंडीत कार घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, ६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
मिरज-पंढरपूर महामार्गावरील सांगोल्यातील जुनोनी येथे हा अपघात झाला. अपघातातील सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत. कार्तिकी एकदशीनिमित्त ३२ वारकरी पायी पंढरपूरला जात होते, तेव्हा हा अपघात घडला.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, जुनोनी येथे पायी चालत असताना टाटा नेक्सॉन कारने त्यांना धडक दिली. या अपघातात ७ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सहा जण गंभीर जखमी आहेत. मृत झालेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलं आहे. जखमींना सांगोल्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.