शेतीला सर्वात मोठा जोडधंदा म्हणून दुग्ध क्षेत्राकडे पाहिले जात आहे. मात्र, योग्य नियोजन आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची माहीती अनेकांना नसल्यामुळे पाहिजे तसा विस्तार अद्यापही झालेला नाही. राज्यात सहाकारी दूध प्रकल्पाबरोबरच खासगी दूध प्रकल्पांचे जाळे आहे. पण याचा फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेलाच नाही. दूध उत्पादनात वाढ झाली पण त्या तुलनेत दरात सुधारणा झाली नाही. हाच धागा पकडून आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे धडे दिले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याकरिता 50 लाख रुपये खर्चून प्रशस्त असे प्रशिक्षण केंद्रही उभारले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सागितले आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे मार्ग खुले होतील आणि शेतकऱ्यांच्या अर्थार्जनात वाढ होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दूधाच्या दरात सुधारणाच झालेली नाही. शिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्यायच नसल्याने दूधाचे उत्पादन तर वाढत आहे पण त्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. प्रक्रियायुक्त पदार्थांमधून शेतकऱ्यांच्या उत्पादनात 30 ते 50 टक्के फायदा होणार आहे. मात्र, याकरिता शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आतापर्यंत अशाप्रकारचे प्रशिक्षण ते ही विद्यापीठाच्या माध्यामातून झालेले नाही. मात्र, हा अनोखा प्रयोग महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ही प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या विकासाच्यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल राहणार आहे. मात्र, या महत्वाच्या मुद्याकडेच आतापर्यंत दुर्लक्ष झाले होते. पण आता कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एका नव्या अध्यायाला सुरवात होत आहे. हा प्रयोग एका कृषी विद्यापीठापुरताच मर्यादित असून याकरिता विद्यापीठ 50 लाख रुपये खर्च करणार आहे. मात्र, अशा उपक्रमामध्ये राज्य सरकारने पुढाकार घेतला तर अणखीन गती येणार आहे.
राज्याच्या दुग्धोत्पादनात नगर, पुणे व कोल्हापूर आघाडीवर आहे. हे तीनही जिल्हे राहुरी विद्यापीठाच्याच कार्यक्षेत्रात येतात. तेथे विशेष प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यात पहिले केंद्र कोल्हापूरला उभे राहण्याची चिन्हे आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या कृषी विद्यालयाला विशेष निधी देखील मंजूर केला आहे. या प्रशिक्षण केंद्राला कसा प्रतिसाद मिळतो त्यावरुन इतर केंद्राचा विचार केला जाणार असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.