आशिया चषकातील सुपर फोरच्या लढतीत टीम इंडियाला पाकिस्तानकडून पाच विकेट्सनी हार स्वीकारावी लागली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतानं दिलेलं 182 धावांचं आव्हान पाकिस्ताननं एक चेंडू राखून पार केलं. या विजयासह पाकिस्ताननं साखळी फेरीतल्या पराभवाची परतफेड केली. सलामीच्या मोहम्मद रिझवाननं केलेली 71 धावांची खेळी पाकिस्तानच्या विजयात महत्वाची ठरली.
त्याआधी विराट कोहलीच्या 60 धावांच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियानं 7 बाद 181 धावा स्कोअरबोर्डवर लावल्या होत्या. पण रवींद्र जाडेजा आणि आवेश खानच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत भासली. त्यामुळे पाकिस्तानला 182 धावांचा पाठलाग करणं जास्त कठीण गेलं नाही.
पाकिस्तानच्या डावात हार्दिक पंड्यानं 17 व्या ओव्हरमध्ये सेट झालेल्या रिझवानला माघारी धाडलं. त्यानं 51 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 71 धावा फटकावल्या. रिझवान बाद झाला तेव्हा पाकिस्तानला 19 चेंडूत 35 धावांची गरज होती. पण त्याच्या पुढच्याच षटकात भुवेश्वरच्या गोलंदाजीवर शॉर्ट थर्डमॅनवर उभ्या असलेल्या अर्शदीप सिंगनं असिफ अलीचा सोपा झेल सोडला. असिफ अलीनं तेव्हा खातंही खोललं नव्हतं. पण त्यानंतर त्यानं 8 चेंडूत 16 धावा फटकावल्या आणि पाकिस्तानचा विजय सोपा केला.
आठ वर्षांनी पाकचा विजय
पाकिस्ताननं आशिया चषकात भारतावर मिळवलेला हा आजवरचा सहावा विजय ठरला. पण गेल्या आठ वर्षात पाकिस्तानकडून भारतानं एकदाही पराभव स्वीकारला नव्हता. 2014 साली शाहीद आफ्रिदीच्या खेळीमुळे पाकिस्ताननं टीम इंडियावर आशिया चषकातला शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर 2016 आणि 2018 साली भारतीय संघ वरचढ ठरला. यंदाही साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानला 5 विकेट्सनी धूळ चारली होती.
विराट कोहली पुन्हा फॉर्मात
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झुंज देत होता. पण आशिया चषकात मात्र विराटनं दमदार कमबॅक केलं आहे. दुबईतल्या पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात विराट कोहलीनं आणखी एक अर्धशतकी खेळी केली. त्यानं 44 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 60 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाला पाकिस्तानसमोर 182 धावांचं आव्हान उभं करता आलं. याआधीच्या दोन सामन्यातही विराटनं अनुक्रमे 35 आणि नाबाद 59 धावा केल्या होत्या.