मराठीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सपाते यांनी आत्महत्या करत जीवन यात्रा संपवली. आत्महत्या करण्याआधी राजू सापते यांनी फेसबूक लाईव्ह केलं. या लाईव्हमधून त्यांनी संघटनेच्या अधिकाऱ्यांवर काही आरोप केले. राजू सापते यांनी केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला एकच धक्का बसला. या घटनेनंतर विविध स्तरातून त्या संघटनेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन योग्य शासन करण्याची मागणी करण्यात येत आहे. आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी राजू सापते यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना केली आहे. निवेदिता सराफ यांनी या संदर्भात इंस्टाग्रामवर व्हीडिओद्वारे ही मागणी केलीय.
“आज हा व्हीडिओ करताना मला खूप दु:ख होतोय. आमचे कला दिग्दर्शक राजू सापतेंनी आत्महत्या केली. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. इतक्या प्रतिभावान, मितभाषी आणि मनमिळावू माणसाला इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं, असा सवाल निवेदिता सराफ यांनी उपस्थित केला.
निवेदिता सराफ यांनी या व्हीडिओमध्ये राजू सापते यांनी आत्महत्येआधी केलेल्या व्हीडिओचा उल्लेख केला. निवेदिता सराफ म्हणाल्या की, “त्यांनी केलेल्या व्हीडिओत म्हटलंय की युनियनच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलंल. मी ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेच्या निमित्ताने राजू सापते यांच्या संपर्कात आले. ते फार टॅलेन्टेड होते. अवघ्या 3-4 दिवसांमध्ये त्यांनी आमच्या मालिकेचा सेट उभा केला. राज्याबाहेर जेव्हा शूटिंग करावं लागलं तेव्हा त्यांनी उपलब्ध साधनांमध्ये त्यांनी सेट उभारुन दिला.
त्यांच्या सोबत जी टीम काम करतेय ती त्यांच्या 5 वर्षांपासून संपर्कात आहे. त्यांनी कधीच कोणाचं पैसे थकवले नव्हते. मग त्यांच्यावर असे आरोप का केले गेले, असा सवालही निवेदिता सराफ यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाच्या मूळाशी जाऊन याचा शोध घ्यायला हवा. राजू सापते यांच्यांकडे 5 प्रोजेक्ट होते. त्या सर्व सेटवरील त्यांचे 30-35 माणसं पोरकी झाले. त्यांचा परिवार पोरका झाला, हे सर्व का घडलं, असा प्रश्न निवेदिता सराफ यांनी उपस्थित केला.
यानंतर निवेदिता सराफ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात मागणी केलीय. त्या म्हणाल्या की, “माझी सर्व संबंधित व्यक्तींना, मुख्यमंत्र्यांना, राज ठाकरे यांना आणि अमेय खोपकरांना कळकळीची विनंती आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, जी काही कीड लागलीये, ती समूळ उखडून टाकली पाहिजे.”