‘शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा–झोडा–मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपला कमळाबाई म्हणत जोरदार टीका केली आहे.
‘ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे. बुलढाण्यात शिवसेनेतील दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. कोण कुठला शिंदे गट व शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर चाल करून गेले. आपापसात डोकी फुटली. एकमेकांचे कपडे फाटले. यात भाजपचे काय गेले? गमावले ते कष्टकरी मराठी माणसाने. त्याच्या एकीची वज्रमूठ जी शिवरायांच्या भगव्या झेंड्याखाली एकवटली होती त्या वज्रमुठीच्या ठिकऱ्या करून भाजप मजा पाहात आहे. हे फक्त बुलढाण्यातच घडले काय? हे महाराष्ट्रात जागोजाग घडवले जात आहे. शिवसेना पाडून त्यांनाच आपापसात झुंजवून संपवायचे. यात आजच्या बेइमानांना क्षणिक लाभ झाला, पण महाराष्ट्र फुटतोय त्याचे काय? असा सवाल सेनेनं शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना केला आहे.
‘आता काय तर म्हणे त्यांचे ‘मिशन मुंबई’ सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’ आहे. मुंबईतील मराठी माणसांत फूट पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा, अशी टीकाही सेनेनं भाजपवर केली.
‘दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे ‘मिशन’ सुरू आहे. काय तर म्हणे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणी घ्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे ‘कमळाबाई’ मानभावीपणे सांगते. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे. दसरा मेळाव्यातून फुंकलेल्या रणशिंगातून ‘कमळाबाई’च्याही वैभवात भर पडली आहे. याच दसरा मेळाव्यात अनेकदा भाजपचे ज्येष्ठ-श्रेष्ठ नेतेही अवतीर्ण झाले आहेत. दसरा मेळावा हा राजकीय जागर असतो. महाराष्ट्राची जनता जागती आहे हे देशाला दाखविणारा एक सोहळा असतो, पण हा दसरा मेळावा म्हणे आता कोण कुठला बाटग्यांचा शिंदे गट घेणार. म्हणून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे बेइमानांचा, ‘सुरती’ बाजारबुणग्यांचा मेळा नसतो. तो असतो अस्सल ज्वलंत मऱ्हाठी – हिंदुत्व अभिमान्यांचा उसळता जनसागर. दसरा मेळाव्याचे शिवतीर्थाशी एक नाते आहे. हे नाते तोडणाऱयांच्या 56 पिढय़ा खाली उतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही, अशी टीकाही सेनेनं केली.
सर्वोच्च न्यायालय आम्ही मॅनेज केले अशी भाषा करणारे एक वेळ भाडय़ाची गर्दी जमवून स्वतःचा जयजयकार करतीलही, पण असे हवेतले बुडबुडे येतात आणि फुटतात. इतिहासात असे अनेक तोतये निर्माण झाले व गांडुळांप्रमाणे नष्ट झाले. न्याय विकत घ्याल, पण जनमताचा उसळता सागर, जो शिवतीर्थावर लोटत असतो तो सागर कसा विकत घेणार? भारतीय जनता पक्षाला शिवतीर्थावरच मराठी लोकांत दोन तट पडून तेथेच मराठी रक्त सांडावे असे वाटते. ज्या शिवतीर्थावरून संयुक्त महाराष्ट्राच्या विराट विजयी सभेतून एकजुटीचे दर्शन घडले, ज्या शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेची आणि विजयाची ललकारी घुमली, ज्या शिवतीर्थावर मऱ्हाठी एकजुटीच्या लाखो वज्रमुठी आवळल्या त्या वज्रमुठी तुटाव्यात हेच भाजपचे मिशन मुंबई आहे. एका बाजूला शिंदे गटास ‘छूः छूः’ करून सोडायचे. दुसऱ्या बाजूला आणखी एखाद्या
मऱ्हाठीधर्मी संघटनेस मतफुटीसाठी वापरायचे व एकदाचा शिवसेनेचा पराभव घडवून मुंबईचा घास गिळायचा हे त्यांचे मिशन असले तरी अशा महाराष्ट्रद्रोही मिशनवाल्यांशी ‘सामना’ करण्याचे सामर्थ्य शिवसेनेच्या मनगटात आहे, असा इशाराही सेनेनं दिला.