इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) शुक्रवारी होणाऱ्या छोटेखानी खेळाडू लिलावात बेन स्टोक्स, सॅम करन आणि कॅमरून ग्रीन यांसारख्या परदेशी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी १० संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल. या लिलावात ३० विदेशी खेळाडूंसह एकूण ८७ स्थानांसाठी ४०५ क्रिकेटपटूंवर बोली लावण्यात येईल.
‘आयपीएल’ लिलावाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी बोली लावण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सने २०२१मध्ये त्याला १६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. यंदाचा लिलाव छोटेखानी असल्याने दहाही संघांकडे मर्यादित रक्कम शिल्लक आहे. असे असले तरी मॉरिसवरील बोलीचा विक्रम मोडला जातो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या इंग्लंडच्या सॅम करनवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. २४ वर्षीय करनला पंजाब किंग्जने २०१९मध्ये चांगल्या किमतीत संघात घेतले होते. यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. चेन्नईचा पुन्हा करनला खरेदी करण्याचा प्रयत्न असेल. पाठीच्या दुखापतीमुळे २०२२च्या हंगामात सहभागी न झालेल्या करनची मूळ किंमत दोन कोटी आहे.
करनशिवाय इंग्लंडचा कसोटी कर्णधार स्टोक्स आणि लयीत असलेला फलंदाज हॅरी ब्रूकवरही चांगली बोली लागू शकते. ब्रूकने नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान दौऱ्यातील तीनही कसोटी सामन्यांत शतक झळकावले. स्टोक्सची मूळ किंमत दोन कोटी रुपये असून ब्रूकची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवरही सर्वाच्या नजरा असतील. त्याने वर्षांच्या सुरुवातीला भारतात झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान सलामीला येताना चमकदार कामगिरी केली होती. लिलावातील मोठय़ा नावांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचाही समावेश आहे. त्याची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे.