चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. लंडनस्थित संशोधक कंपनी Airfinity Ltd च्या अहवालानुसार, चीनमध्ये दिवसाला १० लाख लोकांना संसर्ग होण्याची आणि पाच हजार मृत्यू होण्याची भीती आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या चीनमधील करोनास्थिती गंभीर होऊ शकते असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
अहवालानुसार, जानेवारी महिन्यात चीनमधील रुग्णसंख्या वाढून दिवसाला ३७ लाख रुग्ण आढळू शकतात. मार्च महिन्यात ही संख्या ४२ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. करोनाचा फैलाव सुरु झाल्यापासून Airfinity Ltd त्यावर संशोधन करत असून, सर्व माहिती जतन करुन ठेवली आहे.
चीनने बुधवारी २९९६ रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. तसंच डिसेंबर महिन्यात १० पेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. पण अचानक झालेली रुग्णवाढ आणि स्मशानभूमींबाहेर अंत्यसंस्कारासाठी झालेली मृतदेहांची गर्दी चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीवर संशय निर्माण करत आहे.
सरकार कशापद्धतीने करोना रुग्णसंख्येची मोजणी करतं हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. चीनने गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात चाचणी केंद्र बंद केले असून स्थानिकांना रॅपिड टेस्टवर अवलंबून राहावं लागत आहे. चाचणी केंद्र बंद केले असल्याने चीनकडे रुग्णांची योग्य आकडेवारी उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींमुळे चीनमध्ये करोनाची स्थिती आणि आकडेवारी यामध्ये विसंगती आहे.