“एकनाथ शिंदेंचा NIT भूखंड घोटाळा बाहेर काढण्यात भाजपाचा हात?” अजित पवारांचं मोठं विधान!
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनआयटी भूखंड प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, संबंधित भूखंड १६ खासगी लोकांना भाडेतत्त्वावर दिला होता. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पण हे प्रकरण सर्वप्रथम कुणी समोर आणलं? याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना ८३ कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या २ कोटी रुपयांत दिला. हा घोटाळा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बाहेर काढला. त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली. पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री दालनात भेट झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड काही वेळ चर्चाही केली.संबंधित नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण मागील काही दिवसांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतली आहे. आता पुन्हा नागपुरात ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं पाहायला मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
देशभरामध्ये परत मास्कसक्ती?
चीनमधील करोना उद्रेकानंतर केंद्र सरकारने मास्कसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. देशामध्ये १६३ नवे करोना रुग्ण आढळून आले असून केंद्र सरकारने मास्कसक्तीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सध्या तरी केंद्राकडून मास्क बंधनकारक करण्यासंदर्भात कोणताही निर्णय किंवा निर्देश जारी करण्यात येणार नाही,” असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र सरकारने जारी केलेल्या सूचनांमध्ये लोकांनी स्वत: मास्क घालण्यासंदर्भात आग्रही रहावं आणि करोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं असं म्हटलं आहे. सध्या तरी सरकारकडून मास्कसक्तीचा नियम लागू केला जाणार नाही असं या नव्या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
राज्यसभेत उपराष्ट्रपती धनखड आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख व माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या न्यायव्यवस्था, केंद्र सरकार आणि संसदेच्या कामकाजावरील गंभीर टिप्पणीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी घेतलेल्या आक्षेपांविरोधात काँग्रेसचे सदस्य शुक्रवारी आक्रमक झाले. सोनिया गांधींच्या विधानांवर सभापतींनी दिलेले निवेदन व टिप्पणी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. या मुद्द्यावरून धनखड व काँग्रेसच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसच्या मागणीवर धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व सोनिया गांधी यांच्या मतांवर टिप्पणी का करावी लागली, याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले.
सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ भारतीय जवानांचा मृत्यू
सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे वळणावर मोठा उतारा होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जवानांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत १६ जवानांचा मृत्यू झाला आहे.
‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराज १९ वर्षांनी बाहेर, नेपाळच्या तुरुंगातून सुटका
बिकिनी किलर या नावाने ओळखला जाणारा कुख्यात सीरियल किलर १९ वर्षांनी तुरुंगाबाहेर आला आहे. नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने चार्ल्स शोभराजला सोडण्याचे आदेश दिले होते. बुधवारी हे आदेश देण्यात आले होते त्यानंतर आज चार्ल्स शोभराजची सुटका करण्यात आली आहे. चार्ल्स शोभराज लवकरच त्याच्या मायदेशी म्हणजेच फ्रान्सला परतणार आहे.चार्ल्स शोभराजला २००३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता शोभराज ७८ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने त्याला तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज चार्ल्स शोभराज तुरुंगाबाहेर आला आहे.
“…म्हणून बॉलिवूडचा आदर करा”, ‘KGF’ स्टार यशचं चाहत्यांना आवाहन
‘केजीएफ’ स्टार यशने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत होणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केलंय. त्याच्यामते, आपण भारताचे लोक आहोत आणि आपण सगळे एक आहोत, त्यामुळे असा भेदभाव आणि तुलना केली जाऊ नये. तसेच त्याने आपल्या चाहत्यांना आणि कर्नाटकातील लोकांना बॉलिवूडचा आदर करण्याचं आवाहन केलंय. चित्रपट उद्योगाशी संबंधित अभिनेते किंवा दिग्दर्शक या नात्याने दर्जेदार चित्रपट निर्माण होणे हे सर्वांच्याच फायद्याचे आहे, असंही त्याने म्हटलंय.
बॅटने फ्लॉप, तरीही ‘हा’ कॅरेबियन खेळाडू आयपीएलमध्ये झाला मालामाल
आयपीएल २०२३ साठी, २३ डिसेंबर (शुक्रवार) रोजी कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव होत आहे. सर्व १० फ्रँचायझी संघांसोबतच चाहते आणि क्रिकेटपटूही आयपीएलच्या या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत होते. या लिलाव प्रक्रियेला दुपारी २:३० वाजेपासून सुरुवात झाली आहे. कॅरेबियन स्फोटक अष्टपैलू निकोलस पूरनला देखील या लिलावात मोठी बोली लागली आहे.निकोलस पूरनला लखनौ सुपर जायंट्स संघाने १६ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले आहे, जे खूप आश्चर्यकारक आहे. वास्तविक पूरन दरवर्षी प्रतिष्ठित लीगमध्ये त्याच्या नावानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या रकमेत पूरन विकला गेल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
ऋषभ पंतचे हुकले शतक; पण महेंद्रसिंग धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी
भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या ३१४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा बांगलादेशने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. बांगलादेश अजूनही ८० धावांनी पिछाडीवर आहे. तत्पुर्वी ऋषभ पंतने आपले शतक हुकल्यानंतर, एमएस धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॕडम गिलख्रिस्टच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून, सर्वाधिक ९०पेक्षा अधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. भारताकडून महेंद्रसिंग धोनी या बाबतीत नंबर-१ होता. पण आता ऋषभ पंतने त्याची बरोबरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध ९३ धावांवर बाद झाला. पंत ११व्यांदा ९०पेक्षा अधिक धावांवर बाद झाला आहे. अॅडम गिलख्रिस्टने २० वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर १२ वेळा अशी कामगिरी करून दुसऱ्या स्थानावर आहे. पंत आणि धोनी दोघांनीही ११-११वेळा अशी कामगिरी केली आहे.
SD Social Media
9850 60 3590