राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन याचे निधन झाले. दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. बिहारचा बाहुबली नेता अशी ओळख असलेला मोहम्मद शाहबुद्दीन तिहार जेलमध्ये हत्या प्रकरणात शिक्षा भोगत होता.
कोरोनाची लागण झाल्यानंतर माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन याला मंगळवारी रात्री दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली हायकोर्टाने राज्य सरकार आणि तिहार जेल प्रशासनाला मोहम्मद शाहबुद्दीन याला वैद्यकीय निगराणीखाली योग्य उपचार देण्याचे आदेश दिले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले.
गँगस्टर ते खासदार असा राजकीय प्रवास असलेला मोहम्मद शाहबुद्दीन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. शाहबुद्दीन हा बिहारमधील सीवन मतदारसंघातून राजदच्या तिकीटावर लोकसभा खासदार होता. त्याच्याविरोधीत तीन डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. 15 फेब्रुवारी 2018 रोजी सुप्रीम कोर्टाने त्याला बिहारच्या सीवन तुरुंगातून तिहार तुरुंगात नेण्याचे आदेश दिले होते.
गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याचे पिता शेख मोहमद हसीबुल्लाह यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं होतं. त्यावेळी त्याला पॅरोलवर बाहेर जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. तिहार तुरुंगातील सेलमध्ये एकट्यालाच कैद केलेला मोहम्मद शाहबुद्दीन हा हायप्रोफाईल कैदी मानला जात होता. इतर कैद्यांसोबत तो कमीत कमी काळ संपर्कात येत असे. गेल्या 20-25 दिवसात तो कुठल्या नातेवाईकालाही भेटला नव्हता.तरीही त्याला कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.