कोरोना संकटाच्या वेळी खासगी क्षेत्रातील बँक आयडीएफसी फर्स्ट बँकेने बचत खात्यातील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या ही एकमेव बँक होती, जी लहान बचतीवर 6% व्याजदर देत होती. आयडीएफसी बँक 1 लाखापेक्षा कमी ठेवींवर 6 टक्के व्याज देत होती. 1 मेपासून बँकेने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला.
बँकेने असे जाहीर केले आहे की, जे लोक त्यांच्या खात्यात 1 लाखापेक्षा कमी शिल्लक ठेवतात, त्यांना 4% व्याज मिळेल. ज्या ग्राहकांनी 1 लाख ते 10 लाखांपर्यंत शिल्लक राखली आहे, त्यांना 4.5 टक्के व्याजदर मिळेल, तर खात्यातील शिल्लक 10 लाखांपेक्षा जास्त ठेवल्यास जास्तीत जास्त 5 टक्के व्याज दिले जातील.
सध्याच्या आर्थिक परिस्थितीतही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने कपात केली होती, त्यामुळे कर्जही स्वस्त झाले आणि बँकांनी ठेवीच्या रकमेवरील व्याजदरातही सतत कपात केली. सध्या आयसीआयसीआय बँक 3-3.5 टक्के व्याजदर देत आहेत. एसबीआय 2.7 टक्के दरानं परतावा देत आहे. बर्याच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सध्या बचतीत 3-3.5 टक्के दरानं परतावा देत आहेत.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 5 %, आरबीएल बँक 4.75 %, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 4 %, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 4 %, इक्विटास स्मॉल फायनान्स 3.5. % आणि बंधन बँक 3 % खात्यातील 1 लाखांच्या शिल्लक रकमेवर परतावा देणार आहे. एक लाखाहून अधिक ठेवींसाठी स्मॉल इक्विटास 7 टक्के, उज्जीवन स्मॉल फायनान्स 7 टक्के ऑफर देत आहे.