देशातील १५० जिल्हे कडक
लॉकडाउनच्या उंबरठ्यावर
देशात दररोज कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. देशाच्या अनेक भागात लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. परंतु देशातील १५० जिल्हे हे कडक लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहेत. आरोग्य यंत्रणेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण पडत असल्याने ज्या जिल्ह्यात संसर्गाचा दर १५ टक्क्यांहून अधिक आहे त्या जिल्ह्यात कडक लॉकडाउन लावला जावा, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका उच्चस्तरीय बैठकीत हा सल्ला दिला होता. परंतु राज्यांशी चर्चा झाल्यानंतरच केंद्र सरकार यावर निर्णय घेणार आहे.
काही मिनिटांमध्ये कोविन
अॅपचा सर्व्हर डाऊन
केंद्र सरकारने एक मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करणार असून या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया आज दुपारी चार वाजल्यापासून कोविन अॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत. दुपारी चारच्या सुमारास १७ कोटी ८८ लाख भारतीय आरोग्य सेतू अॅपचा वापर करत होते अशी माहिती समोर आली आहे. आरोग्य सेतू तसेच कोविन अॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याचं दिसून आलं आहे.
१ मे पासून लसीकरण
सुरू होणार नाही : टोपे
केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र लसीकरणाविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्यातल्या तरूण वर्गाने लसीकरणाची तयारी देखील केली होती. मात्र, राज्यात या वर्गासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये यासंदर्भातला निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं ते म्हणाले आहेत.
मतमोजणी केंद्रावर येताना
निगेटिव्ह अहवाल बंधनकारक
२ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालासंदर्भात निव़डणूक आयोगाने अजून एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पूर्वोत्तर राज्यांना
भूकंपाचे जोरदार धक्के
मेघालय आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांना आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सातच्या सुमारास सर्वात मोठा झटका बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 नोंदवली गेली. आसाममध्ये तर इमारतींनाही तडे गेले. अनेक घर आणि प्लॅटमधील भिंतीचे प्लास्टर कोसळून पडले. जोरदार भूकंपांमुळे पूर्वोत्तर राज्यातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
एकाच रुग्णवाहिकेत
कोंबले 22 मृतदेह
बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर 22 मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेवर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
प्राईम सेंटर रुग्णालयाला
आग, चार रुग्णांचा मृत्यू
मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये 14 तर अतिदक्षता विभागात (ICU) सहा रुग्णांवर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले. मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली.
बँकांनी, खासगी वितीय
संस्थांनी कर्ज वसुली थांबवावी
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशात व विशेषतः महाराष्ट्रात थैमान घातलेले असतांना बँका व अनेक खाजगी कर्जपुरवठादार वितीय संस्था लॉकडाऊनमध्येही सक्तीची वसुली करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाव्दारे अशा वसुलीला कोरोना स्थिती सामान्य झाल्यानंतर दोन महिन्यापर्यत स्थगिती देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलास द्यावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वित्त विभाग महाराष्ट्र शासनाकडे सदर मागणीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे सूचित केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
शालेय व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना
शिक्षणापासून वंचित ठेवू नये
कोरोनामुळे आर्थिक संकटाला तोंड देणारे पालक शालेय फीस भरू शकले नाही, तर शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांना ऑइलाइन किंवा ऑफलाइन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला आहे. शाळेच्या फिससंदर्भातील एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सोमवारी न्यायालयाने हा आदेश दिला. परंतु उच्च न्यायालयाक़डून दिलेल्या या दिशानिर्देशांचा दुरुपयोग केला जाऊ नये हे सुनिश्चित करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. देशातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून बंद करण्यात आले होते.
गोवा राज्यात
२९ पासून लॉकडाउन
महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेलं आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन
आमदाराला विकले : हीना गावित
नंदूरबार जिल्ह्यातील गरीब आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सीएसआर फंडातून सरकारला मोफत मिळालेली एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला विक्रीसाठी दिली, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हीना गावित यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माध्यमप्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.
कोरोनामुळे माजी खासदार
एकनाथ गायकवाड यांचे निधन
माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. आज सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले. गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
SD social media
9850 60 3590