राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत एकूण 5 हजार 142 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 125 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या अभियानातून आपल्या राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना (Farmers) विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सक्षम व उत्पादनक्षम बनविण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेची तोंडओळख होण्यासाठी भुसे यांनी बैठक घेतली. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विभागीय कृषी सह संचालक संजय पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी जितेंद्र शाह, मालेगावचे उपविभगीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे कृषी विद्याव्यत्ता विजय कोळेकर तसेच मालेगाव तालुक्यातील 141 गावातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच सदस्य यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.
कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आपला देश हा कृषीप्रधान आहे. कृषीक्षेत्रात आपल्या राज्याचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेवून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस हवामान बदलत आहे.
अवकाळी पाऊस, ओला व कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. यासाठी त्या गावाचा सर्वांगिण विकास करताना पावसाचे प्रमाण, उपलब्ध पाणी, तेथील वातावरण आणि गरज लक्षात घेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मंत्री भुसे म्हणाले की, शेतकरी बांधवांना वातवरणातील बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी व शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविणे आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन व तंत्रज्ञानावर आधारित सूक्ष्म नियोजन तसेच वेळोवेळी गावपातळीवर शेतकऱ्यांना शेतीच्या विविध योजना लाभ मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभेचही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा जपून वापर व्हावा यासाठी गावातील छोटे व मोठे बंधारे यांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.