खान्देशातील विविध कोविड (Covid) रुग्णालयांकडे 8 कोटी 37 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे आता नाईलाजास्तव या रुग्णालयांवर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणने म्हटले आहे. कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला.
यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे कळवण्यात आले आहे.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीज जोडण्यांची 1 कोटी 84 लाख 64 हजार 244 रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 10 लाख 69 हजार 113 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल 5 कोटी 22 लाख 79 हजार 634 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे 53 लाख 29 हजार 989 रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे 15 लाख 49 हजार 795 रुपये वीजबिल थकले आहे.
नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 51 लाख 3 हजार 142 रुपये वीजबिल थकीत आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी या रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते. थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांकडून कोणताही योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही