प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीला संधी देण्यात आलीय. जॅक डोरसी यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिल्यानंतर आता पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्त करण्यात आलंय. तशी अधिकृत घोषणा करण्यात आली असून माजी सीईओ जॅक डोरसी यांनी अग्रवाल यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे अग्रवाल यांचं शिक्षण मुंबई आयआयटीमधून झालेलं आहे.
भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या मुख्य कार्यकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. तर जॅक डोरसी हे 2022 पर्यंत कंपनीच्या बोर्डावर कायम असतील. अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2011 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत विशेष सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये काम पाहिलेलं आहे. त्यानंतर 2017 मध्ये अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच सीटीओ म्हणून काम पाहिले. याआधी त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्ये काम केलेलं आहे. विशेष म्हणजे अग्रवाल यांनी त्यांचं बिटेकचं शिक्षण आयआयटी मुंबईमधून पूर्ण केलेलं आहे. कॉम्यूटर सायन्स अँड इंजिनिअररिंगमध्ये ते निष्णात आहेत.
जॅक डोरसी यांच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ बनले आहेत. तर डोरसी यांनी आपल्या राजीनाम्यानंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मला पारगवर पूर्ण विश्वास आहे. त्याची मागील दहा वर्षातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यातील कौशल्य आणि प्रतिभेचा माझ्यावर कायमच प्रभाव राहिलेला आहे, असे मत व्यक्त केलेय.