सॕटर्डे क्लब धुळे चॕप्टरच्या व्याख्यानमालेत प्रतिपादन
उद्योग व्यवसायाच्या प्रगतीसाठी जिद्द,चिकाटी,धैर्य आणि सातत्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन येवले अमृततुल्य चे फाऊंडर अॕण्ड मॕनेजिंग डायरेक्टर श्री.नवनाथ येवले यांनी आज धुळे येथे उद्योजकांसमोर केले.सॕटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ,धुळे चॕप्टर आणि शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालयांतर्गत एमबीए विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध उद्योजकतेचा’ या व्याख्यानमालेत 8 वे पुष्प गुंफतांना येवले बोलत होते.
घरची खडतर परिस्थिती, कर्जाचा डोंगर असतांना देखील न डगमगता धैर्याने तोंड दिले. 32 वेगवेगळे व्यवसाय केल्यानंतर वडील कै. दशरथ येवले यांनी सुरुवात केलेल्या चहाच्या टपरीपासून पुन्हा एकदा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि आज 300 पेक्षा जास्त फ्रेंचाइजी महाराष्ट्रात कार्यरत आहेत. भविष्यात गुजरात,मध्यप्रदेश ,कर्नाटक ,केरळ आणि राजस्थानमध्ये ही विस्तार होणार असल्याचे येवले यांनी बोलतांना सांगितले.
सुरवातीच्या काळात डिटर्जंट पावडर, पेन,फाईल, भाजीपाला,मशरुमची शेती,मोबाईल दुरुस्ती आणि खरेदी विक्री यासह इस्टेट ब्रोकर चा ही व्यवसाय करुन पाहीला आणि कर्जाचा डोंगर वाढवून घेतला.पण व्यवसाय करतांना घेतलेल्या कर्जाला घाबरुन जाऊ नका.व्यवसायातला पैसा आपल्याच व्यवसायात लावा,वैयक्तिक कारणांसाठी वापरु नका. माझं वाईट मीच केलं होतं ,म्हणून मलाच लढावं लागणार होतं. कारण माझ्या स्वतःच्या व्यवसायाचं मार्केटींग,सिस्टिम प्रोसेस,व्हिजन ,मिशन हे ठरलेले होते.म्हणून आपल्या व्यवसायाचा सखोल अभ्यास करावा असे ही व्याख्यानमालेत बोलतांना सांगितले.
आपल्या व्यवसायाची उंची वाढवा.आपल्या प्राॕडक्ट ची गुणवत्ता कायम राखा.रोजगार उपलब्ध करुन द्या.आता पर्यंत आम्ही 5000 हून अधिक लोकांना रोजगार मिळवून दिल्याचे ही येवले अभिमानाने सांगतात.”बेरोजगार मुक्त जग” अशी आमच्या येवले गृपची थीमलाईन असल्याचे येवले सांगून पुढे म्हणाले की, सुई ते विमान विकण्याची ताकद ठेवा.आपला माईंड सेट सकारात्मक ठेवा. इच्छाशक्ती आणि सातत्य ठेवा यश तुमच्या पायाशी लोळण घेईल.
भविष्यात फुडमाॕल ,बेकरी माॕडेल सुरु करण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला. फ्रेंचाइजी च्या माध्यमातूनच व्यवसाय वाढतो.आम्ही रोज किमान या माध्यमातून 5 लाख कप चहा विकत असल्याचे सांगितले.व्यवसाय करतांना आपल्या परिवाराची ही काळजी घ्या कारण मी अडचणीत असतांना परिवारानेच मला भक्कम साथ दिली होती.मुलांना चांगले संस्कार द्या.त्यांना उद्योजकतेचे धडे लहानपणापासून मनात रुजविण्याचे भावनिक आवाहन ही शेवटी येवले यांनी केले.
श्री येवले यांनी सांगितलेल्या महत्वाच्या टिप्स
• रोज ध्यान करा
• सावध रहा
• पैसा सर्व काही नाहीए
• एकमेकांना मदत करा
• आपला व्यवसाय आपल्यालाच कळत असतो
• मी हे करु शकतो आत्मविश्वास ठेवा
• कमी भांडवलात आणि दुसऱ्यांच्या भांडवलावर व्यवसाय वाढवा
• व्यवसायात चांगल्या कल्पना शक्तीचा वापर करावा
• आपल्या व्यवसायाचा USP ( युनिक सेलींग पाॕईन्ट ) शोधा
• प्राॕडक्टची चांगली ब्रॕन्डींग करा
• व्यवसाय वाढीसाठी सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करा
• प्रत्येक गोष्टीला पर्याय शोधा
• मार्केटिंग च्या आम्ही 75 क्लुप्त्या वापरल्या,आपण ही मार्केटिंगवर अधिकाधिक भर द्या.
यावेळी व्यासपीठावर संग्राम लिमये, अभय भादलीकर , नितीन पाटील,अक्षय सावजी,एमबीए विभागाचे प्रमुख महेंद्रसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्याक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करुन झाली.सुत्रसंचालन डाॕ.जितेश पाठक यांनी केले तर आभार अक्षय सावजी यांनी मानले. यावेळी धुळे शहरातील विविध उद्योजक आणि एमबीए चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.