शांतता काळात क्षेपणास्त्राचे भरकटणे,
काही प्रश्न निर्माण करणारे
भारतीय भूमीतून अपघाताने डागले गेलेले क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किलोमीटर आतमध्ये कोसळल्याच्या घटनेबद्दल संरक्षण मंत्रालयाने खेद व्यक्त केला आहे. नियमित देखभालीवेळी तांत्रिक दोषामुळे हा प्रकार घडला. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. क्षेपणास्त्राने आपल्या हवाई हद्दीेचे उल्लंघन झाले, शिवाय विमान वाहतूक सुरक्षा निकषांचे पालन झाले नसल्याचा आक्षेप पाकिस्तानकडून घेतला जात आहे. शांतता काळात क्षेपणास्त्राचे भरकटणे, काही प्रश्न निर्माण करणारे नक्कीच आहे.
रशियाची वेगवगेळ्या प्रकारे कोंडी,
अमेरिकेने घेतला पुढाकार
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही सुरुच आहे. तर दुसरीकडे नाटोमधील देशांसह इतर अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला असून रशियाची वेगवगेळ्या प्रकारे कोंडी केली जात आहे. अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या परिवारावर निर्बंध लादले आहेत. पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची पत्नी आणि मुले अलिशान जीवन जगत असून ते पेस्कोव्ह यांच्या मिळकतीच्या विसंगत आहे.
रशियन माध्यमांची स्ट्रिमिंग
बंद करण्याचा यूट्यूबचा निर्णय
जगभरात प्रसिद्ध असलेल्या यूट्यूब या व्हिडीओ स्ट्रिमिंग मंचानेही रशियन सरकारतर्फे निधी पुरविला जाणाऱ्या सर्व माध्यमांची स्ट्रिमिंग बंद करुन त्यांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यूट्यूबच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. यूट्यूबने रशियन सरकारकडून निधी पुरविला जाणाऱ्या सर्वच माध्यमांवर जगभरात बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत रशियाच्या हिंसक कारवायांना नाकारणारे सर्व व्हिडीओ कन्टेंट काढून टाकले जाणार आहे. तर अशा माध्यमांचे जगभरात कोठेही स्ट्रिमिंग केले जाणार नाही, असे यूट्यूबने सांगितले आहे.
दोन वर्षांनंतर पंतप्रधान मोदी
आपल्या आईला भेटले
चार राज्यांमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं असल्याने देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. दरम्यान, या निकालानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आपल्या आई हिराबा यांची त्यांच्या अहमदाबाद इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पंतप्रधान सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या आईची भेट घेतली. गेली दोन वर्षे पंतप्रधान त्यांच्या आईला भेटले नव्हते. काल रात्री दोन वर्षांनंतर पंतप्रधान मोदी आपल्या आईला भेटले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप
चव्हाण य़ांनी फेटाळून लावले
देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या संभाषणांच्या व्हिडीओ क्लिपमधील संभाषण वाचून दाखवलं. यामध्ये नवाब मलिक, शरद पवार, अनिल देशमुख, यांच्याबद्दलचे अनेक वादग्रस्त उल्लेख आले आहेत. या व्हिडीओ क्लिपवर आता सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चव्हाण य़ांनी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. चव्हाण यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे. त्याचबरोबर मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केलं असल्याचंही चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
ही तर सरकारची
बालबुध्दी? : आशिष शेलार
मुंबई पोलिसांकडून फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धीने असे तुणतुणे वाजवता. मग..घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी?लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात!” असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
दिल्लीत लागलेल्या भीषण
आगीत सात जणांचा मृत्यू
दिल्लीतील गोकलपुरी येथे लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला. शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री आग आटोक्यात आणण्यात आली, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाने आज दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सात मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
भारताने इंडिजला धूळ चारली,
१५५ धावांनी विजय नोंदवला
एकदीवसीय महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना चांगलाच रंगला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताने इंडिजला धूळ चारली असून तब्बल १५५ धावांनी विजय नोंदवला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१७ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. हे लक्ष्य गाठत असताना वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १६२ धावांवर गारद झाला.
SD social media
9850 60 35 90