नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. सात दिवसांत ‘झुंड’ने 10 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. या आठवड्यात झुंडला ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘राधेश्याम’ या चित्रपटांची टक्कर आहे.
प्रदर्शनाच्या दिवसापासूनच ‘झुंड’ सोशल मीडियावर चर्चेत आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला तर काहींनी त्यावरून टीका केली. असं असलं तरी चित्रपटाच्या कथेकडे, त्यातील कलाकारांच्या दमदार कामाकडे आणि चित्रपटातील भावनेकडे अनेकांनी लक्ष वेधलं आहे. ‘झुंड’ला आयएमडीबी रेटिंगसुद्धा 9.3 इतकी मिळाली आहे.
ट्विटर, फेसबुकवर अनेकांनी ‘झुंड’ या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘झुंड’ हा चित्रपट अप्रतिम असून आयएमडीबी रेटिंग 9.3 इतकी आहे, असं सांगणाऱ्या एका नेटकऱ्याला बिग बींनी ‘मी कृतज्ञ आहे’ असं म्हटलंय. ‘झुंडची टीम सर्वांची मनं जिंकतेय’ असं एकाने ट्विटरवर लिहिलंय. त्यावर कमेंट करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, ‘मी भारावून गेलो आहे.’
नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.