काश्मिर खोर्यात दहशतवादी सक्रीय झाले असून त्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमधील एका गावच्या सरपंचाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी आणखी एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काश्मिरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुलगाम परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांच्या शोधासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील आडोरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच शब्बीर अहमद मलिक यांना लक्ष्य करून गोळीबार केला. या हल्ल्यात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला.
बुधवारी श्रीनगरमधील खोनमोह भागात एका सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. समीर अहमद भट असे त्या सरपंचाचे नाव आहे. लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या रेझिस्टन्स प्रâंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. पोलीस अधिकार्यांनी सांगितले की, सरपंच भट यांना सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यांना श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. याचदरम्यान दहशतवाद्यांनी भट यांच्यावर हल्ला केला होता.
काश्मिर खोर्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली होती. पुलवाम्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडील दारुगोळा व शस्त्रास्त्रे जप्त केली. गुरुवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील नैना बाटपोरा येथे पहिली चकमक झाली. यात दोन दहशतवादी मारले गेले. ते दोन्ही दहशतवादी ‘लष्कर-ए-तोएबा’शी संबंधित असल्याचे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. दुसरीकडे, श्रीनगरच्या हजरतबल भागात एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले, तर दोघे पळून गेले. यावरून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट होत आहे.