जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य ताजं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने वादग्रस्त मागणी केली आहे. औरंगाबाद शहरामध्ये औरंगजेबाचा जुना महाल आहे, त्याचं संवर्धन करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. शहरामध्ये G20 अंतर्गत अनेक रिपेअरिंगची काम सुरू आहेत, त्यातच औरंगजेबाच्या महालाची दुरूस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
‘औरंगजेबाच्या महाल मोठा आणि सुंदर आहे. ऑक्सफर्ड आणि पेनसिलव्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये या महालाची नोंद आहे, त्यामुळे या महालाला चांगलं करण्यात यावं. कलेक्टर आणि कमिशनर जिकडे राहत आहेत ती जागाही मुघल शासकाच्या जमान्यातली आहे. हा महाल अधिकाऱ्याला द्या किंवा सरकारी कार्यालय बनवा. मुसलमान शासक होता म्हणून हे तोडायचं का? हीच आपली मानसिकता आहे का? हेरिटेज म्हणून याचा वापर करा, अशी आमची मागणी आहे,’ असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एलियास किरमाणी यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या मागणीवर शिंदे गटाकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. औरंगजेबाची कबर खोदणारा महाराष्ट्र आहे, असं शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई म्हणाले आहेत. ‘सर्वसामान्य माणसं जशास तसं उत्तर देतील. क्षणभर मलाही चीड आली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाने हाल करून वध केला, मात्र अशा माणसाच्या कब्रेला सुशोभिकरण करणं योग्य नाही. मी एक मंत्री असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही,’ असं शंभुराज देसाई म्हणाले आहेत.