राजस्थानची लोकप्रिय एँकर अंकिता शर्माचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अंकिताचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अंकिताच्या फॉर्च्युनर गाडीचा ड्रायव्हर इमरान यानेही उपचारादरम्यान प्राण गमावला. अपघातामध्ये फॉर्च्युनर गाडीचाही चक्काचूर झाला. अपघाताआधी अंकिताने काही तासांपूर्वीच पालीच्या रणकपूरमध्ये लग्नाचं एँकरिंग केलं होतं. त्याच दिवशी रात्री 1 वाजता अंकिता बीकानेरला जाण्यासाठी निघाली होती.
बीकानेरला निघताना अंकिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. नेक्स्ट डेस्टिनेशन रणकपूर टू बीकानेर, असं कॅप्शन अंकिताने तिच्या पोस्टला दिलं होतं. बीकानेरमध्येही तिला लग्नाचं एँकरिंग करायचं होतं.
लग्नाच्या कार्यक्रमाला पोहोचण्याआधी पहाटे 5 वाजता जोधपूर-नागौर नॅशनल हायवे-62 वर खींवसरजवळ अंकिताच्या गाडीने ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये अंकिता आणि तिच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला.
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ओव्हरटेक करत असताना फॉर्च्युनर समोरून येणाऱ्या ट्रकसमोर आली. अपघातात अंकिताचा जागीच मृत्यू झाला, तर ड्रायव्हर इमरानला खींवसरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याचंही निधन झालं. खींवसर पोलिसांनी अंकिता आणि इमरानचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवलं. शवविच्छेदनानंतर दोघांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबाला देण्यात आलं. अंकिताचा नवरा कुलदीप शर्मा बँकेत नोकरी करतात. तर अंकिताला 14 वर्षांचा मुलगाही आहे.