तुर्कस्तान आणि सिरिया हे दोन देश सध्या भूकंपाने हादरले आहेत. सोमवारी झालेल्या या भूकंपामुळे दोन्ही देशात हाहाकार उडाला असून यात तब्बल 8 हजारहून अधिक नागरिक यात मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकड्यात आणखी वाढ होण्याती भीती व्यक्त होत असून यात एका फुटबॉलपटूचा मृत्यू झाल्याने फुटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे.
तुर्कीमध्ये गेल्या काही दिवसात 7.8, 7.6 आणि 6.0 तीव्रतेचे सलग तीन भूकंप झाले. या भूकंपात तुर्कस्तानचा 28 वर्षीय फुटबॉलपटू अहमत इयुप तुर्कस्लान याचा देखील यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात अहमत इयुप ढिगाऱ्याखाली अडकला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बचाव पथकाला त्याचे शव मिळाले.
मागील दहा वर्षांपासून अहमत इयुप तुर्कस्लान हा वरिष्ठ स्तरावरील फुटबॉल मध्ये खेळत होता. त्याने आतापर्यंत पाच संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्याने 87 सामने खेळले होते. काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह देखील झाला होता. याच्या मृत्यूने जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.