मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना सगळ्यात मोठा धक्का दिला आहे. संजय राऊतांच्या जामीनावर स्वाक्षरी करणाऱ्या जामीनदारालाच शिंदेंनी त्यांच्या पक्षात घेतलं आहे. थोड्याच वेळात या नेत्याचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश होत आहे. भाऊसाहेब चौधरी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत.
भाऊसाहेब चौधरी हे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ते उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख होते, तसंच ते संजय राऊत यांचं अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. संजय राऊत यांच्या कोर्ट कामकाजातील क्रमांक एकची व्यक्ती म्हणून भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे बघितलं जातं.
अवघ्या दोन दिवसांपूर्वीच भाऊसाहेब चौधरी यांनी संजय राऊत यांचा जामीनदार म्हणून कोर्टात स्वाक्षरी केली होती. संजय राऊतांसाठी स्वत:ची मालमत्ता हमीपत्र चौधरींनी कोर्टात सादर केलं. तरुण तडफदार आणि संयमी संघटक म्हणून भाऊसाहेब चौधरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली.
भाऊसाहेब चौधरी हे कायम संजय राऊत यांच्यासोबत असायचे. कोणताही प्रवास अथवा कार्यक्रमाला भाऊसाहेब चौधरी संजय राऊत यांच्यासोबत जायचे. शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी यापेक्षा संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान भाऊसाहेब चौधरी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. ‘शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे’, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्वीट करून दिली आहे.पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणातल्या आरोपांवरून संजय राऊत हे 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये होते. आर्थर रोड जेलमध्ये इतके दिवस घालवल्यानंतर संजय राऊत यांची सुटका करण्यात आली. ईडी कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. यावर जामीनदार म्हणून भाऊसाहेब चौधरी यांनी स्वाक्षरी केली.