राज ठाकरेंची ‘सावली’ एकनाथ शिंदेंसोबत एकाच व्यासपीठावर

नागपूरमध्ये सध्या राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच्या महासत्तांतर या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उपस्थित होते, पण त्यांच्यासोबत व्यासपीठावर असलेल्या मनसेच्या नेत्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदेंच्या सत्तांतराच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि आमदार प्रताप सरनाईकही हजर होते.

बाळा नांदगावकर हे मनसेचे सगळ्यात जुने नेते आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेतून आलेलं महत्त्वाचं एकमेव नाव म्हणजे बाळा नांदगावकर. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यातली जवळीक वाढत आहे, त्यातच आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती लावली.

शिंदेंनी सांगितला राज ठाकरेंचा किस्सा

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंसोबतचा किस्सा सांगितला. 2012 साली ठाणे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते, पण भगवा झेंडा खाली येऊ नये यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली होती, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘आंदोलनात 200 कार्यकर्ते जेलमध्ये होते, ते बाहेर येईपर्यंत शांत बसलो नव्हतो. तेव्हापासून राजकीय करिअरला वळण मिळालं. राजकारणात शब्द आणि विश्वास याला अत्यंत महत्त्व असतं. मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला नव्हता. नगरविकास मंत्री असताना खात्यात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप होता. मी कधीच घाबरलो नाही. फक्त माझ्यासोबत असणाऱ्या 50 आमदारांची मला चिंता होती,’ असं विधान एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात केलं.

जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष अशा 50 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. पुढे शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदारांनीही शिंदेंना साथ दिली. शिवसेनेत झालेला हा भूकंप आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटनांवर हे पुस्तक आधारित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.