उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे मुंबईमध्ये पार पडले. या दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात स्मिता ठाकरे, निहार ठाकरे आणि जयदेव ठाकरे उपस्थित होते. एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात आणखी काही प्रवेश होतील, असं बोललं जात होतं, पण ही फक्त चर्चाच ठरली.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे आणखी 2 खासदार आणि 5 आमदार सहभागी होतील, असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हेदेखील दसरा मेळाव्यात शिंदे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू होत्या पण मिलिंद नार्वेकर शिवतिर्थावर उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी स्टेजवर होते.
मिलिंद नार्वेकर येत्या काळात शिवसेनेत येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला होता. गुलाबराव पाटील यांच्या या दाव्यानंतर मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
शिंदे नार्वेकरांच्या घरी
एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवामध्ये मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हापासून नार्वेकरांच्याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. शिवसेनेमध्ये याआधी झालेल्या बंडावेळी अनेकांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करत शिवसेनेची साथ सोडली होती.
कोण आहेत मिलिंद नार्वेकर?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. 54 वर्षांचे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचं राजकीय सल्लागार मानले जातात. 2018 साली मिलिंद नार्वेकर यांना शिवसेना सचिव म्हणून घोषित करण्यात आलं होतं.