एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीची सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपोषणात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
आजपासून एसटी कर्मचारी राज्यभर बेमुदत उपोषण करणार आहेत. पगार वेळेत मिळावा, रखडलेली देणी लवकर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचीही मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, पाच टक्के महागाई भत्तात वाढ, अडीच हजार रुपये दिवाळी भेटीची घोषणा एसटी महामंडळाने केल्यानंतरही त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी जर एसटी सेवा कोलमडल्यास उपोषणात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असं परिपत्रकच एसटी महामंडळाने काढले आहे. त्यामुळे आंदोलन होणार की नाही, याची उत्सुकता आहे.