सोशल मीडियावर सध्या अंबरनाथच्या ‘सिलेंडर मॅन’ सागर जाधवची हवा आहे. एखाद्या वेब सीरिजमध्ये शोभणारं पात्र म्हणत तुषार भामरे नावाच्या तरुणाने सर्वप्रथम सागरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर थेट प्रख्यात अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडेने सागरला ऑफर दिली आहे. आगामी चित्रपटात सागर जाधवला संधी देण्याचं आश्वासन प्रवीण तरडेने दिलं, अशी माहिती तुषार भामरेने दिली आहे.
दरम्यान, या ‘गॅसवाल्या’ला ज्याने सिलेंडर मॅन म्हणून सर्वांसमोर आणलं, त्या तुषार भामरेला शोधलं आणि त्याच्याशी संवाद साधला. यावेळी तुषारने सागर जाधव हा सर्वात आधी कुठे दिसला, इथपासून ते त्याचे फोटो कसे व्हायरल झाले आणि सागरचं नशीब कसं पालटलं, या सर्वांची कहाणी सांगितली.
जनसंपर्क क्षेत्रात काम करणारा तुषार भामरे हा पत्नीसोबत चष्मा खरेदी करण्यासाठी अंबरनाथ पूर्वेच्या वेल्फेअर सेंटर परिसरात आला होता. त्यावेळी गाडीत बसलेले असताना अचानक त्याला समोर विचारमग्न सागर जाधव सिलेंडरच्या टेम्पोला टेकून उभा असलेला दिसला. त्याचं व्यक्तिमत्त्व पाहून तुषार भामरेला एखाद्या वेब सीरिजमधला भारदस्त ग्रे शेडचा व्हिलन किंवा थेट मन्या सुर्वे डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्याने सहज त्याचे दोन फोटो काढले. हे फोटो त्याने सहज म्हणून फेसबुकवर टाकले खरे, पण त्यावेळी ते इतके व्हायरल होतील आणि त्यामुळे भविष्यात सागर हा स्टार होईल, असं वाटलंही नव्हतं, असं तुषार भामरे सांगतो.
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यानेच सागरचा नंबर शोधून संपर्क साधला आणि आधी न विचारता फोटो काढल्याबद्दल आणि ते सोशल मीडियावर टाकल्याबद्दल माफी मागितली. कारण सागरला यामुळे मनस्ताप तर झाला नसेल ना? अशी शक्यता तुषारला वाटून गेली. पण सागर मात्र त्याला मिळत असलेल्या प्रेमामुळे अक्षरशः भारावून गेला होता आणि उलट त्यानेच तुषारचे आभार मानले. यानंतर तुषार आणि सागर यांनी पहिल्यांदाच भेटत एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या.
यावेळी फोटोत दिसणारा धिप्पाड सागर हा प्रत्यक्षात मात्र खूपच बुजरा किंवा पटकन न खुलणारा, काहीसा लाजाळू असल्याचं जाणवलं, असं तुषार सांगतो. पण काही वेळाने सागर कम्फर्टेबल झाल्यावर मात्र त्याने आपल्याशी छान गप्पा मारल्याचं तुषारने सांगितलं. ‘सिलेंडर मॅन’ म्हणून ओळख मिळालेल्या सागरला माध्यमांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण या सगळ्यानंतर आता त्याला खरोखरच एखादी चांगली संधी मिळावी आणि त्याचं आयुष्य पालटावं, अशी इच्छा तुषार भामरेने व्यक्त केली.