केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
३ दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर
मागील काही दिवसात कट्टरतावाद्यांकडून जम्मू काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांसह सुरक्षा दलावरही हल्ले झाले. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी सर्वात आधी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला भेट दिली. मृत अधिकारी परवेज अहमद यांच्या पत्नीला सरकारी नोकरीची कागदपत्रे सूपूर्त केली. शाह यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.
उदयनराजे भोसले यांची
अजित पवार यांच्यावर गंभीर टीका
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना मुस्काडले पाहिजे असं गंभीर वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे. क्रीडा अधिकाऱ्यांच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी हे वक्तव्य केले आहे. क्रीडा संकुलाबाबतही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ
शिवप्रतिष्ठान युवा मोर्चाची घोषणाबाजी
मुंबईमध्ये २ ऑक्टोबर रोजीच्या कारवाईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. असं असतानाच सांगलीमध्ये आज समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मोर्चा काढल्याचं दिसून आलं. ‘समीर वानखेडे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’, ‘वी सपोर्ट समीर वानखेडे’, ‘ड्रग्ज माफीयांना पाठीशी घालणाऱ्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो,’ अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या.
लामखागा खिंडीत बेपत्ता
ट्रेकर्सपैकी 12 जणांचे मृतदेह सापडले
उत्तराखंडमधील लामखागा खिंडीत हवाई दलाचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. लामखागा खिंडीत १७ हजार फूट उंचीवर, ट्रेकिंगसाठी गेलेले खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे आपला रस्ता चुकले होते. १८ ऑक्टोबर रोजी १८ गिर्यारोहक लामखागाजवळ हिमालयीन ट्रॅकवर गेले होते. खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे काही सदस्य हरवले. तेव्हापासून सर्व बेपत्ता आहेत. मात्र शोधमोहिमेनंतर १२ ट्रेकर्सचे मृतदेह सापडले आहेत. दोघांची सुटका करण्यात आली आहे तर दोघांचा तपास सुरू आहे.
तक्रारदारच गायब पण
खटला मात्र सुरू : मुख्यमंत्री
आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरु आहे अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह
चंदीगडमध्ये असण्याची शक्यता
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या कित्येक दिवसांपासून गायब आहेत. न्यायालयात देखील सुनावणीसाठी ते येत नसल्यामुळे ते फरार असल्याचा संशय आहे. राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चंडीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू असताना त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यासोबत जोडण्यात आलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीमुळे परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परमबीर सिंह चंदीगढमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
काडीपेट्यांच्या किमती
तब्बल १४ वर्षांनंतर वाढल्या
आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य लोकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, भाज्यांनंतर आता काडीपेट्यांच्या किमती वाढणार आहेत. तब्बल १४ वर्षांनंतर काडीपेट्यांच्या किमती वाढल्या आहेत. याआधी २००७ साली काडीपेट्यांच्या दरात वाढ झाली होती. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे ही वाढ करण्यात आल्याचे उद्योगाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
लग्नानंतर महिन्याभरात पत्नीला विकले,
अल्पवयीन पतीने घेतला मोबाईल
लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात एका अल्पवयीन नवऱ्यानं आपल्या बायकोलाच विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या कुटुबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. त्यानंतरही मुलीला विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या गावकऱ्यांनी “आम्ही तिला विकत घेतलंय, सोडणार नाही”, असं म्हणत पोलिसांनाच आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. महिला सबलीकरण आणि महिला सशक्तीकरणाच्या कितीही चर्चा झाल्या, तरी वास्तवात परिस्थिती बदलायला अजून बरेच प्रयत्न आवश्यक असल्याची प्रतिक्रिया यावर व्यक्त होऊ लागली आहे.
T20 वर्ल्ड कप सामन्यात दक्षिण
अफ्रिकेचे तीन फलंदाज बाद
टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघात होत आहे.
दक्षिण आफ्रिकेला टेम्बा बवुमाच्या रुपाने पहिला धक्का बसला. बवुमा ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने ७ चेंडूत १२ धावा केल्या. या खेळीत २ चौकारांचा समावेश आहे. टेम्बा पाठोपाठ रस्सी दुस्सेनही तंबूत परतला आहे. ३ चेंडूत २ धावा करून तंबूत परतला आहे. क्विंटन डिकॉकही मैदानात जास्त काळ तग धरू शकला नाही. ७ धावांवर असताना हेझलवूडच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का बसला.
26 ऑक्टोबर नंतर देशात काही
भागात पाऊस पडण्याची शक्यता
देशातून सध्या नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच राजस्थानातून देशाबाहेर जात आहे. देशात काही ठिकाणी 26 ऑक्टोबर पासून देशाच्या काही भागात पुन्हा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. देशात काही ठिकाणी उत्तरपूर्व म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
SD social media
9850 60 3590