कोरोना साथीरोगाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. यानुसार देशभरात 1 लाख फ्रंटलाईन वर्कर तयार केले जाणार आहेत. त्यांना सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार आहे. यासाठी ‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ लाँच करण्यात आलाय. यात 6 क्रॅश कोर्सचा समावेश आहे. त्यामध्ये कमीत कमी वेळेत तरुणांना कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित केलं जाईल. हा कोर्स MSDE (कौशल्य विकास आणि उद्योजकता) मंत्रालय आणि ‘स्किल इंडिया’ अंतर्गत सुरू करण्यात आलाय.
हा कार्यक्रम 26 राज्यांमधील 111 ट्रेनिंग सेंटर्समध्ये लाँच करण्यात आलाय. यामुळे नोकरीच्या संधी तयार होतील असा दावा केला जातोय. या कोर्समध्ये जवळपास 1 लाख तरुणांना प्रशिक्षण देऊन फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून तयार करण्यात येईल.
‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ अंतर्गत देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये कलेक्शन सपोर्ट आणि मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट सारख्या विशिष्ट कामांसाठी प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण मोफत दिलं जाणार असून त्यासोबत जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय या कामासाठी मानधन देखील दिलं जाणार आहे. याबरोबर यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या फ्रंटलाईन वर्करला 2 लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जाणार आहे.
कोविड-19 हेल्थकेयर फ्रंटलाइन वर्कर्सच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी क्रॅश कोर्स योजनेंतर्गत 273 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. तरुणांना फ्रंटलाइन वर्कर्स बनवण्यासाठी स्किल इंडियाने 6 नवे अभ्यासक्रम तयार केलेत. “COVID फ्रंटलाइन वर्करचा (होम केयर सहायक)” कोर्स पूर्ण केल्यानंतर संबंधित तरुणांना गृह स्वास्थ्य सहयोगी म्हणून काम करता येणार आहे.
6 नवे अभ्यासक्रम
बेसिक केयर सहायक
अॕडव्हान्स केयर सहायक
होम केयर सहायक
आपातकालीन केयर सहायक
सँपल कलेक्शन सहायक
चिकित्सा उपकरण सहायक