खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
संगमनेर येथे पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. गेहलोत म्हणाले, की पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या पदावर मी जावे असे पक्षात मत असल्याने आपण शनिवारी खासदार राहुल गांधी यांना भेटून अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहोत.
दरम्यान, भाजपवर टीका करताना गेहलोत म्हणाले, की सध्या काही जण जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून विविध राज्यांमध्ये सरकार बरखास्त केली जात आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुरुपयोगसुद्धा या जातीयवादी शक्तींनी केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘राहुल यांच्या यात्रेला सरकार घाबरले’
गेहलोत म्हणाले, की सध्या देशामध्ये भीतीचे वातावरण आहे. साहित्यिक, पत्रकार, विचारवंत यांना अटक केली जात आहे. या हुकूमशाहीविरुद्ध काँग्रेस पक्ष लढतो आहे. काँग्रेसला मोठी परंपरा असून कितीही संकटे आली तरी काँग्रेस खंबीरपणे उभी राहणार आहे. भारत जोडो आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून केंद्र सरकार राहुल गांधी यांच्या या आंदोलनाला घाबरले असल्याचेही ते म्हणाले. ‘