क्राईम ब्रांचचे माजी पोलीस निरीक्षक सुनील माने
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने ( NIA) सुनील माने यांना बेड्या ठोकल्या. माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं.
मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं ? याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या चौकशीतून एटीएसच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. त्याशिवाय एटीएसने सचिन वाझेंचं लोकेशन तपासलं आणि मोबाईल टॉवर आणि आयपीचं मूल्यांकनही केलं होतं. तसेच अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.