गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागला
पेट्रोल डिझेल शंभरीपार गेल्यानंतर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर पुन्हा भडकले आहेत. या महिन्यात गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागला आहे. मुंबई आणि दिल्लीतील १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरचे दर आता ८३४.५० रुपयांनी वाढले आहेत. एप्रिलमध्ये हेच दर ८०९ रुपये होते. या वर्षी जानेवारी ते आतापर्यंत १४.२ किलो वजनाचा सिलिंडर १४०.५० रुपयांनी महागला आहे. दिल्लीत सिलिंडरचा दर ६९४ रुपये इतका होता.
दिल्लीमध्ये पोस्ट कोविडशी
संबंधित सर्वाधिक रुग्ण
कोविडरूपी अग्निदिव्यातून बाहेर पडलेल्या रुग्णांना आता पोस्ट कोविड संबंधित अनेक त्रास सुरू झाले आहेत. पोस्ट कोविड प्रकरणांबाबत दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये संपर्क साधला असता, सरकारी आणि खासगी रुग्णालयात सध्या पोस्ट कोविडशी संबंधित सर्वाधिक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल झालेले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. बरे झाल्याच्या महिन्यानंतरही काहींना पोटदुखी तर काहींना श्वास घेता येत नसल्याच्या तसेच काहींना ताप येण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही रुग्णांमध्ये अतिकाळजीमुळे मानसिक आरोग्याशी संबंधित लक्षणेही दिसत आहेत.
अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन
कारखाना बळकावला
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून कारखाना बळकावल्याचा आरोप एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
पवार कुटुंबियांनी अनेक साखर कारखान्यांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केला : सोमय्या
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. पवार कुटुंबियांनी अनेक साखर कारखान्यांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
तुमचा भुजबळ करु
असं सांगितलं जातं
ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, “कुणावर तरी आरोप करायचे, कुणाला तरी नोटिसा द्या असं सुरु असतंय. त्यात ईडी म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं. पण, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल”, असं सांगत भुजबळ यांनी टीकास्त्र डागलं.
शंभर कोटींसाठी बैठक झाली
होती, संजीव पलांडेने दिला जबाब
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आता चांगलीच वाढ झालेली आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांच्या माध्यमातून अनेक खुलासे होऊ लागले आहेत. शंभर कोटींसाठी बैठक झाली होती, अशी माहिती पहिल्याच चौकशीत पलांडे यांनी ईडीला दिल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांमध्येही देशमुख यांचाच हात होता, असेही त्यांनी सांगितले आहे.
युरोपातील ९ देशांची
कोव्हिशिल्ड लशीला मान्यता
युरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडही कोव्हिशिल्डला मान्यता देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जुलै महिन्यात देशभरात १०६ टक्के
पाऊस पडण्याची शक्यता
यंदा जून महिन्यात भारतात सरासरी आणि काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आता जुलै महिन्यात देखील देशभरात सरासरीच्या तुलनेत ९६ ते १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचा अंदाज जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जाहीर केला जाईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. भारतीय हवामान शास्त्र विभागाने जुलै महिन्याचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
केंद्राने केलेली फेरविचार
याचिका न्यायालयाने फेटाळली
१०२ व्या घटनादुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच, पर्यायाने केंद्र सरकारलाच आहे, हा पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केला. या घटनादुरुस्तीनंतरही मागासवर्ग निश्चिातीचा राज्याचा अधिकार अबाधित आहे, अशी भूमिका घेत केंद्राने केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आता केंद्राच्या अखत्यारित गेला आहे.
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन
लढ्याला मोठा धक्का
केंद्र सरकारची फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राष्ट्रीय राजकारणावर काँग्रेसची
पकड सैल : सुशीलकुमार शिंदे
काँग्रेसमध्ये संवाद, चर्चा आणि बैठकांची परंपरा संपल्याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केलेले वक्तव्य नेत्यांचा संयम सुटत असल्याचे संकेत आहेत. शिंदे पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्तीय असल्याने त्यांच्याकडून पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे महत्त्वाचे मानले जात आहे. राष्ट्रीय राजकारणावर काँग्रेसची पकड सैल होत असल्याबाबतची चलबिचल सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतीच पुणे येथे व्यक्त केली आहे.
पंजाब काँग्रेस अध्यक्षपदासाठी
नवज्योसिंग सिद्धू यांचं नाव चर्चेत
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या दरम्यान, आता आगामी काळातील विधानसभा निवडणुकी अगोदर मंत्रिमडळात व संघटनात्मक फेरबदलची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. याचबरोबर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड यांच्या जागी आता नवा चेहार आणला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी नवज्योसिंग सिद्धू यांचं नाव अधिक चर्चेत आहे.
भारतीय वंशाचा अभिमन्यू मिश्रा
जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर
भारतीय वंशाचा १२ वर्षीय अमेरिकन बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा हा जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे. मूळचा भारतीय वंशाचा आणि सध्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथील रहीवासी अभिमन्यू हा १२ वर्षे, ४ महिने, २५ दिवसांचा असून त्याने यापुर्वीचा विक्रमवीर रशियाच्या सर्गेई करजाकिन याचा २००२ मधील सुमारे १९ वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. तो खेळाडू तेव्हा १२ वर्षे, ७ महिने वयाचा होता. तर आता बुधवारी बुडापेस्टमध्ये भारताच्या ग्रँडमास्टर लिओनचा पराभव करून अभिमन्यूने हे कामगिरी केली.
फाळके पुरस्काराने सन्मानित
कलावंताची अवस्था बिकट
बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सिनेमांचं कला दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच्यावर सध्या आर्थिक संकट कोसळलं आहे. लीलाधर सावंत आपल्या पत्नीसोबत सध्या बिकट परिस्थितीमध्ये राहत आहेत. लीलाधर सावंत यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत लीलाधर सावंत यांनी त्यांच्यावर ओढावलेल्या बिकट परिस्थितीचा खुलासा केलाय.
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला
ईडीकडून समन्स जारी
नुकतीच लग्न बंधनात अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून समन्स जारी करण्यात आलंय. ईडीने यामी गौतमला चौकशीसाठी बोलावलं आहे. यामीने FEMA (Foreign Exchange Management Act ) संबंधित उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यामीला या प्रकरणी हा दुसरा समन्स पाठवण्यात आला असून. मुंबईत ईडीच्या झोन-२ मध्ये तिची चौकशी होणार आहे.
महाराष्ट्रात ऑप्रेशन
लोटससंदर्भातील शक्यता
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन २० मिनिटं चर्चा झाली. दिल्लीतील या चर्चेनंतर फडणवीस तातडीने महाराष्ट्रात परतले होते. त्यानंतर महाराष्ट्रामधील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपाचे मोजके महत्वाचे नेते उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर अनेक नवीन विषय राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आले असून यामागे ऑप्रेशन लोटससंदर्भातील शक्यताही व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री
डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन
दोनवेळा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री राहिलेले डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. एक कुशल नोकरशहा आणि आधुनिक अमेरिकी लष्कराचे द्रष्टे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. मात्र इराकमध्ये दीर्घकाळ चाललेल्या व महागड्या ठरलेल्या युद्धाने त्यांच्या या प्रतिमेला गालबोट लावले होते.
SD social media
9850 60 3590