आज दि.२३ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

एकेकाळच्या लावणी सम्राज्ञीला भिक मागण्याची वेळ, ST बस स्थानकच झालं घर

एकेकाळची लावणी सम्राज्ञी.. जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्यांनी गाजलं. जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं, ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागतेय. बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे.या आहेत शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर. एकेकाळी याच शांताबाईच्या लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला. लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजवलं. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून 40 वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला. शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला. बक्कळ पैसा मिळू लागला. मालक आहोत या तोऱ्यात अशिक्षित शांताबाईची फसवणूक झाली. अत्तार भाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्धवस्त झाल्या. त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं, त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या. पती नाही, ना कुणी जवळचं नातेवाईक. कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचं घर झालंय आणि आता कुणी घर देतं का घरं.. असं म्हणण्याची वेळ आली.

अजित पवारांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट

राज्यात सर्व पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाबाबत युती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत. घटक पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य जागांचा आढावा देखील घेण्यात येत आहे. यावेळची लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती बीआरएसनं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. दरम्यान अजित पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना बीआरएसला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. यावरूच विरोधक देखील बीआरएसबाबत सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे.के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आगामी निवडणुका डोळ्यासमोर जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा देखील झाल्या आहेत. इतर पक्षातील अनेक नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये देखील धडक मारली आहे. काही दिवसांपूर्वीच के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते नागपुरात बीआरएसच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळावा देखील घेतला आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा प्रशासनाकडून सोलापूर प्रशासनाकडे, साताऱ्याकडून निरोप

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा साताऱ्यातील पाच दिवसांचा प्रवास आटोपून सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हरी नामाचा गजर करीत हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी सातारा व सोलापूर हद्दीवर वारकरी भाविकांनी माउली माउलीचा गजर केला. यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी राजुरीपासून ते सोलापूर जिल्ह्यच्या सीमेपर्यंत माउलींच्या रथाचे सारथ्य केले.सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आज धर्मपुरी (जि. सोलापूर) येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत केली. यावेळी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

आज रात्रीपासूनच पडणार पाऊस

कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच विविध भागात मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.  २४ ते २७ जून या काळात राज्यात कमी वेळेत मूसळधार पाऊस होईल, असेही खात्याने म्हटले आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २३ जूनला मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच कोकण भागात पावसाला सुरुवात होईल. २४ जूनला पावसाचा जोर वाढेल. तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचे आगमन होणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, जूनचा उत्तरार्ध येऊनही राज्यातील अनेक भागात मान्सून न पोहचला नसल्याने शेतकऱी चिंतित  होते.  आता हवामान खात्याने  मान्सूनच्या आगमनाची तसेच तो राज्यात सर्वत्र पसरण्याचे संकेत दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशादायक वातावरण निर्माण होत आहे.

बाबो! घरात फक्त एक बल्ब, पण बिल आले लाखोंच्या घरात

कर्नाटकातील कोप्पल तालुक्यातील भाग्यनगर येथे एका झोपडी वजा शेडमध्ये एका ९० वर्षीय महिला राहते. गिरिजम्माला असं या वृद्धेचं नाव. तिच्या घरात फक्त एक बल्ब आहे. त्यामुळे तिचं नियमित वीजबिल फक्त ७० ते ८० रुपये येतं. परंतु, मे महिन्यात तिला १ लाख ३ हजार ३१५ रुपये बिल आलं. बिलावरची ही रक्कम पाहूनच तिला शॉक बसला. एका बल्बचे एवढं वीजबिल पाहून तिने थेट वीज पुरवणाऱ्या गुलबर्गा वीज पुरवठा कंपनीचं (गेस्कॉम) कार्यालय गाठलं. तसंच ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. तिने हे वीजबिल कमी करून देण्याची मागणी कंपनीकडे केली. नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी कंपनीचे अधिकारी घरी आले. त्यांनी वृद्धेचा मीटर तपासला. त्यावेळी मीटर रीडिंगच्या त्रुटीमुळे जास्तीचं बिल आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टायटन पाणबुडीत पाच जणांचा जीव गमावला

टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली टायटन ही पाणबुडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. ९६ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन ही पाणबुडी रविवारी (१८ जून रोजी) समुद्राच्या तळाशी झेपावली होती. काहीच तासांनी या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि ती बेपत्ता झाली. त्यानंतर अमेरिकेसह कॅनडाच्या नौदलाने तसेच पाणबुडी ऑपरेट करणाऱ्या कंपनीने ही पाणबुडी शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू केली होती. अखेर चार दिवसांनी या पाणबुडीमधील पाचही अभ्यासकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडी ऑपरेट करणारी कंपनी ओशिएनगेटने दिली आहे.या पाणबुडीमध्ये ब्रिटीश उद्योगपती हमिश हार्डिंग, पाकिस्तानी गुंतवणूकदार शाहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश यांचा समावेश होता. 

भारत वेस्ट इंडिजविरुद्ध १० सामने खेळणार

भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारताला विंडीजविरुद्द एकूण १० सामने खेळायचे आहेत. यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने अशा एकूण तीन मालिका खेळायच्या आहेत. १२ जुलैपासून उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. परंतु भारतीय संघ त्याच्या एक महिना आधीच कॅरेबियन बेटांवर दाखल होणार आहे. भारताची अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भारताचं शेड्यूल व्यस्त नाही. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पहिल्या कसोटीच्या किमान १० दिवस अगोदरच टीम इंडियाला कॅरेबियन बेटांवर पाठवणार आहे. भारतीय क्रिकेटपटू तिथे जाऊन तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. भारतीय संघ १ जुलैपर्यंत वेस्ट इंडिजला पोहोचेल.दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा भारताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. कसोटीत अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल तर एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी असेल.

व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अमेरिकन टीमचे केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते व्हाईट हाऊसमधील डिनरचे कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी खेळाविषयीही चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, क्रिकेट खेळ अमेरिकेतही लोकप्रिय होत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. अमेरिकेच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.यासोबतच त्यांनी अमेरिकन संसदेलाही संबोधित केले. या संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध वाढविण्यावर चर्चा झाली. यासोबतच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढता धोका, सीमेपलीकडील दहशतवादात पाकिस्तानची भूमिका आणि रशिया-युक्रेन युद्धाबाबतही भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाली.व्हाईट हाऊसमध्ये डिनरचे दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “बेसबॉलप्रमाणे अरिकेतही क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी अमेरिकेचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.” मात्र, अमेरिकेचा संघ भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

भारताला ३१ यूएस प्रीडेटर ड्रोन मिळाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. तसेच त्या भेटीचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळत आहेत. भारतात येणारे ३१ प्रीडेटर ड्रोन हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारताचा हा संरक्षण करार पूर्ण करण्यात पंतप्रधान मोदींबरोबर आणखी एका व्यक्तीनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात… डॉ. विवेक लाल यांच्यामुळेच भारत आणि अमेरिका यांच्यातील ३१ प्रीडेटर ड्रोनचा करार शक्य झाला असून, त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डॉ. विवेक लाल हे जनरल अॅटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संरक्षण क्षेत्रातील भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि सहकार्य मजबूत करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या व्यापाराला गती देण्याचे काम केले आहे.

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, डिजिलॉकरमध्ये वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवता येणार

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ही सुविधा आणली असून, यामध्ये तुम्ही तुमचे लॉकर ऑनलाइन माध्यमातून उघडू शकता. येथे तुम्ही तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज सहज ठेवू शकता. हे लॉकर्स अतिशय सुरक्षित आहेत.डिजिलॉकरला डिजिटल लॉकर असेही म्हणतात. हे तुम्हाला अस्सल आभासी दस्तऐवजांची सोय देते. हे एक प्रकारचे डिजिटल दस्तऐवज वॉलेट आहे. यामध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे जमा करू शकता. जेव्हा तुम्ही हे लॉकर उघडता, तेव्हा तुम्हाला अनेक कागदपत्रे एका क्लिकवर मिळणार आहेत. हे लॉकर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले आहे.

टाटांच्या TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; कमिशनमध्ये घेतले १०० कोटी, ४ अधिकारी निलंबित

गेल्या काही दिवसांपूर्वीच महिला राजीनामा देत असल्यानं चर्चेत आलेल्या टीसीएस कंपनीमध्ये आता घोटाळा झाल्याची माहिती मिळाली आहे. नोकरीच्या बदल्यात लाच मागितल्याची बाब उघडकीस आली आहे. नोकरीशी संबंधित घोटाळे अनेकदा समोर येत असतात, पण आता असे प्रकरण समोर आले आहे, जो बहुधा अशा प्रकारचा पहिलाच नोकरी घोटाळा असावा.लाइव्ह मिंटच्या एका बातमीनुसार, सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून मोठं कमिशन घेतले. हा संपूर्ण भाग एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे, ज्याने या प्रकरणाची माहिती TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे (आरएमजी) जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचारी कंपन्यांकडून त्यांना कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे.

‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांचं निधन

मराठी चित्रपट ‘हृदयात समथिंग समथिंग’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर झाली आहे. आज (२३ जून रोजी) सकाळी दहा वाजता पुण्यात मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रवीण यांच्या निधनाने मराठी चित्रपसृष्टीवर शोककळा पसरली आहे.प्रवीण कारळे हे नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे पूत्र होते. वयाच्या चौथ्या वर्षी प्रवीण यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अगदी लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले प्रवीण कारळे यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे लोकप्रिय चित्रपट आहेत.

भारतीय नौदलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; अग्निवीर भरती प्रक्रिया होणार सुरू

केंद्र सरकारची ‘अग्निवीर’ योजना सुरू झाल्यापासून सतत काहीना काही कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना सेवेत घेतलं जात आहे. भारतीय नौदलाने अग्निवीर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे 35 पदं भरण्यात येणार आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. नोंदणी प्रक्रिया 26 जून रोजी सुरू होईल. नोंदणी प्रक्रियेसाठी 2 जुलै हा शेवटचा दिवस असेल.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.