आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही ! मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय
विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला आहे. येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाईल. तसेच याच दिवशी मुस्लीम समुदायाचा पवित्र सण बकरी ईदही आहे. त्यामुळे यंदा दोन सणांचा अनोखा संगम पाहायला मिळेल. विशेष म्हणजे संभाजीनगरच्या वाळूज भागातील मुस्लीम बांधवांनी यंदा बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे.सोमवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून बकरी ईदची जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र उत्सवाचं वातारण आहे. तर, दुसरीकडे टाळ मृदुंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे.
प्रिया बेर्डेंनंतर सुरेखा पुणेकरांनी बदलला पक्ष; लावणी सम्राज्ञीची BRS मध्ये एंट्री
सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या राजकारणाच्या मार्गावर चालताना दिसत आहे. अभिनेत्री मेघा धाडे हिनं काही दिवसांआधी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर आता लावणी सम्राज्ञी सुरेख पुणेकरांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या बीआरएस पक्षात सुरेखा पुणेकर यांनी प्रवेश केला आहे.हैद्राबादमध्ये जाऊन त्यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केला. सुरेखा पुणेकर या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैद्राबादमधील डेरे येथे दाखल झाल्या आहेत.मागील वर्षीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र मणगटावरील घड्याळ काढून त्यांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे.
मान्सूनच्या आगमनासाठी उरले 24 तास, बळीराजासाठी आनंदाची बातमी
कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्याापसून मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे.जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे.
हिरा है सदा के लिए; नरेंद्र मोदींकडून अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला हिरा भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आज व्हाईट हाऊसवर (अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थान) जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांची भेट घेतली. अध्यक्ष बायडेन आणि फर्स्ट लेडी स्वतः मोदींच्या स्वागतासाठी हजर होत्या. मोदींना त्यांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि बायडेन दाम्पत्याने फोटोसेशनही केलं.नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरा भेट म्हणून दिला आहे. हा एक ग्रीन डायमंड आहे. तर मोदींनी अध्यक्ष जो बायडेन यांना ‘दृष्टिसहस्त्रचंद्रो’ ही १० वेगवेगळ्या गोष्टी असलेली चंदनाची पेटी भेट म्हणून दिली आहे. ही भेट अशा व्यक्तीला दिली जाते ज्याने एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत. या पेटीत बायडेन यांच्यासाठी एकूण १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
विरोधकांच्या महाआघाडीची उद्या बैठक; अजेंड्यावर जातगणना आणि जागावाटप!
पाटणामध्ये शुक्रवारी होणाऱ्या भाजपविरोधी महाआघाडीच्या बैठकीमध्ये जातनिहाय जनगणना आणि एकास एक उमेदवार या दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यावर सहमती झाली तर किमान समान कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकेल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचा अजेंडा तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर मात करायची असेल तर राज्या-राज्यात जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला पाहिजे, हा विचार बहुतांश विरोधी पक्षांनी प्रभावीपणे मांडला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने जातिनिहाय जनगणना केली असली तरी, सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे.
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अडचणी वाढणार? ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे
मुंबईत दोन दिवस ईडीचं धाडसत्र सुरू आहे. कोविड काळातल्या घोटाळ्यांबाबात महापालिकेतील तत्कालिन अधिकारी, कर्मचारी आणि ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्या घरी हे छापे टाकले जात आहेत. ईडीने बुधवारी मुंबईत 15 ठिकाणी छापे टाकले. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सचिव सूरज चव्हाण यांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत ईडीचे चौकशी सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर हेदेखील ईडीच्या रडारवर आले आहेत. सोबतच महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या घरीही धाड टाकण्यात आली.मुंबईतल्या या धाडींमध्ये ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या हाती 150 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्र आली आहेत. याशिवाय 68 लाखांची रोकड आणि 1 कोटी 82 लाखांचे दागिने, तसंच 15 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही ही ईडीला सापडले आहेत. सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या.
राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी भुजबळ आशावादी, स्वत:सोबत घेतली आणखी तिघांची नावं
विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, आपल्याला या पदामध्ये रस नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं. एवढच नाही तर आपल्याला संघटनेमध्ये काम करायची इच्छाही अजित पवारांनी बोलून दाखवली, त्यामुळे अजित पवारांची नजर प्रदेशाध्यक्षपदावर असल्याचंही बोललं जात आहे.
अजित पवारांच्या या मागणीनंतर छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे. तसंच त्यांनी आपलीही प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा असावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी स्वत:सह आणखी तीन नेत्यांची नावं घेतली आहेत.
लेखकानंतर आता दिग्दर्शकाच्या जीवाला धोका; ओम राऊतला पोलिसांकडून सुरक्षा
आदिपुरुष हा चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. व्हीएफएक्सपासून ते डायलॉग्सपर्यंत लोकांचा रोष उफाळून आला आहे.याशिवाय चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आदिपुरुषबाबत वाढत चाललेला वाद पाहून मनोज यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती.मनोजनंतर आता या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत बद्दल मोठी अपडेट येत आहे. ओम राऊत यांनाही पोलिसांनी सुरक्षा पुरवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लबला भीषण आग, आयसीसीने सामन्यांच्या आयोजनाबाबत घेतला ‘हा’ निर्णय
हरारे स्पोर्ट्स क्लबला मंगळवारी रात्री आग लागली. हे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक पात्रता सामने आयोजित केले जात आहेत. आगीच्या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. स्फोट होऊनही मैदानाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयसीसीच्या सुरक्षा पथकाने आणि झिम्बाब्वे क्रिकेटने केलेल्या तपासणीनंतर स्पर्धेसाठी त्याचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये पाहायला मिळाला. त्याआधी या मैदानावर झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांच्यात सामना झाला होता. स्टेडियमला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने तेथे पोहोचले. काही वेळातच आगीवरही नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वीरेंद्र सेहवाग बनणार भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता?
भारतीय संघाला यावर्षी दोन मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. एक आशिया कप आणि दुसरा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक. या दोन्ही स्पर्धांमध्ये सर्वांच्या नजरा संघ निवडीवर असणार आहे. चेतन शर्मा यांनी मुख्य निवडकर्ता पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर निवड समितीमध्ये रिक्त पद आहे.सध्या भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहेत. दरम्यान, रिक्त असलेल्या एका पदाबाबत माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागचे नाव वारंवार समोर येत आहे. मात्र, निवडकर्त्यांना दिले जाणारे वेतन ही मोठी अडचण असल्याचे बोलले जात आहे.
SD Social Media
9850 60 3590