हॉकी वर्ल्ड कप २०२३ मध्ये भारताने पहिल्या सामन्यात स्पेनवर 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवला. पहिल्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये हार्दिक सिंहने गोल केला. यानंतर भारताने सामन्यात आघाडी कायम राखली
हाफ टाइमपर्यंत भारताने दोन गोल केले होते. सुरुवातीच्या ३० मिनिटात भारताने आक्रमक खेळ करत स्पेनवर दबाव वाढवला. भारताने गोलसाठी चार शॉट मारले यातील दोनमध्ये यश मिळालं. दुसरीकडे स्पेननेही गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. भारतीय खेळाडूंनी हाफटाइमपर्यंत चेंडूवर ताबा ठेवला होता.
भारताला ३७ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र हरमनप्रीत सिंह मैदानात नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात भारताला अपयश आलं. भारताची ४३ व्या मिनिटावरही पेनल्टी हुकली होती. पाचपैकी चार पेनल्टीवर भारताला गोल करता आले नाहीत.
हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताचा दुसरा सामना आता १५ जानेवारीला बलाढ्य असलेल्या इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडने याआधी पूल डीमध्ये वेल्सला ५-० अशा गोल फरकाने पराभूत केलं आहे. आता पूल डी मध्ये जास्त गोल फरकाने सामना जिंकल्याने इंग्लंड पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.