26 सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे. यानंतर पुढील नऊ दिवसांसाठी दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये देवी पृथ्वीवर अवतरते आणि भक्तांचे दुःख दूर करते अशी मान्यता आहे. तसेच या काळात भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील मानले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. याबद्दलच ज्योतिषाचार्य पंडित वसंत गाडगीळ यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.
अशी करावी घटस्थापना
ओल्या मातीचा छोटा चौकोनी ओटा ‘वेदी’ करून त्यावर एका मातीच्या, सोन्या-चांदीच्या वा मातीच्या कलशाची स्थापना करून त्यावर देवतेची स्थापना अश्विन शुक्ल प्रतिपदेला करायची हीच घटस्थापना. कलशाखालील ओल्या मातीच्या त्या ओट्यावर नवधान्यांची पेरणी करून रोज थोडे पाणी शिंपडायचे. ताबडतोब त्याला लुसलुशीत कोंब फुटतात. भविष्यांतील भरघोस कृषींचें-शेतीचें हे सूचक प्रसाद चिन्ह. नवरात्रीचे नऊ दिवस या घटावर रोज एकेक माळ-नवदुर्गासाठी सोडायची हाच नवरात्राचा शुभारंभ आहे.
माता शैलपुत्री देवीचा मंत्र
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्ध-कृत-शेखराम्। वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ॥
आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. घटस्थापनेचा नवरात्र महोत्सवातील पहिला दिवस. या दिवशी नवरात्र महोत्सवामधील पूजनीय अशा नवदुर्गापैकी पहिल्या दुर्गादेवतेचे शैलपुत्रीचे पूजन करायचे. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून हिचे नांव ‘शैलपुत्री’ पार्वती
वृषभ (बैल)वाहन(वृषारूढाम् ) असणाऱ्या दुर्गामातेच्या उजव्या हातांत त्रिशूल आहे (शूलधराम्). डाव्या हातात कमळ आहे. दुर्गामातेच्या मस्तकावर चन्द्रकोर आहे (चन्द्रार्ध – कृत – शेखराम्). माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी (वाञ्छित-लाभाय ) सदैव यशस्वी असणाऱ्या (यशस्विनीम्) या शैलपुत्रीला- प्रथम दुर्गामाता स्वरूपाला मी भक्तिभावाने प्रणाम करतो (वन्दे). योगी उपासनेचा प्रारम्भ आज आपल्या मनाला मूलाधारचक्रात स्थिर करून शैलपुत्री दुर्गामातेच्या पूजनाने करतात. आजची माळ पहिली. आज लावलेला नंदादीप अखंड ठेवायचा, असं ज्योतिषाचार्य पंडित वसंत गाडगीळ सांगतात.