शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पेपर फुटीचा सूत्रधार तुकाराम सुपेच्या घरातून दिवसेंदिवस कोट्यावधीची घबाड उघड होतायत. पुणे पोलिसांनी तिसऱ्यांदा टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरी आणि कार्यालयांमध्ये 33 लाखांची रोकड सापडली. तर आतापर्यंत एकूण 3 कोटी 88 लाख जप्त करण्यात आलेत.
आतापर्यंत 3 कोटी 88 लाख जप्त केले आहेत यात पहिल्या धाडीत 88 लाख जप्त केले आहेत, दुसऱ्या धाडीत दोन कोटी रोकड आणि 70 लाखाचं 1.5 किलो सोनं जप्त केले आहे. तर तिसऱ्या धाडीत 33 लाख जप्त करण्यात आले आहेत. परीक्षा घोटाळा प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, बंगळुरूमधून जी.ए टेक्नॉलॉजीचा संचालक प्रीतेश देशमुखसह बीडमधून संजय सानप या मुख्यसूत्रधारांना अटक करण्यात आलीय. मात्र या प्रकरणाचे तार अगदी मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा आरोप करत विरोधकांनी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलंय. तसेच प्रकरणाच्या CBI चौकशीचीही मागणी केलीय.
एका बाजूला पेपर फुटीमुळे विरोधकांनी सरकारला घेरलंय. तर दुसरीकडे पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आता आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात हे पाहावं लागेल. विरोधकांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला उत्तर देताना अजित पवारांनी, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी केली, त्याचं काय झालं? असा सवाल भाजपला विचारलाय. या चौकशीत आणखीही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्याता आहे. मात्र सध्या तरी यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे.