आज दि.30 सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

निवडणुकीआधीच युतीत ठिणगी? शिंदेंचा मंत्री म्हणतो भाजपसोबत युती नको!

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, तसंच राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचसोबत आगामी निवडणुकाही भाजपसोबत युती म्हणूनच लढल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

एकीकडे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते युती निश्चित असल्याचं बोलत असले तरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. सिल्लोड मतदारसंघात येणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिंदे गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे, असं सत्तार म्हणाले आहेत.

जसप्रीत बुमरा; वर्षभरात केवळ 5 टी20, वर्ल्ड कपमधूनही ‘आऊट’,

जसप्रीत बुमरा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्वाचा शिलेदार मानला जातो. गेल्या काही वर्षात बुमराचं भारतीय क्रिकेटमधलं योगदान फार मोठं आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये बुमरा खेळणार नाही हे कळल्यावर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराला याआधी आशिया कप स्पर्धेलाही मुकावं लागलं होतं. त्यानंतर आशिया कपमध्ये भारताचं आव्हान सुपर 4 मध्येच संपुष्टात आलं. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये बुमरावर टीम इंडियाची मोठी मदार होती.

“लोकनेत्या असल्यामुळे त्यांनी मस्करीत वक्तव्य केलं तरी….” पंकजा मुंडेंबाबत काय म्हणाले एकनाथ खडसे?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट मोदींना आव्हान दिले. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पंकजाताई मुंडे यांनी जे पंतप्रधान यांच्या विषयी केलेलं वक्तव्य हे अर्धवट मीडियामध्ये प्रकाशित झालं आहे. कालचे वक्तव्य हे पूर्ण जर ऐकलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. मी मोदीजींना आवाहन देऊ शकत नाही, असं पंकजाताईंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सांगितले.मी बेरोजगार आहे त्यांनी हे वक्तव्य मंदिरात कार्यकर्त्यांशी बोलताना मस्करीमध्ये बोलताना केलं. मीच बेरोजगार आहे तर तुला रोजगार कसा देऊ असं कार्यकर्त्यांशी बोलताना त्या म्हणाल्या. या विषयाचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. पंकजाताईंनी मस्करीमध्ये देखील म्हटलं तर लोकनेत्या असल्यामुळे हलचल निर्माण होते, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बांधकामे पाडून बुलेट ट्रेनसाठी जमीनीचा ताबा घेतला, पीएम मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. या मार्गासाठील लागणाऱ्या जमीनींचा ताबा घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान ठाणे शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जमीनीचा ताबा घेण्याची आज अंतीम तारीख होती. त्याची गांभीर्याने दखल घेत अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आली आहेत. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वे नंबरमधून तोडली. बुलेट ट्रेनकरिता लागणाऱ्या जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी देण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी जातीने हजर राहत जमीनीचा ताबा घेतला.

गांधी घराण्याच्या विश्वासू नेत्याने केला अध्यक्षपदासाठी अर्ज, या मोठ्या नेत्यांनी दिलं समर्थन

गांधी घराण्याचे विश्वासू सहकारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रवेश केला आहे. ते आणि शशी थरूर शुक्रवारी आपले नामांकन दाखल करतील. तर दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढले आहे. ते आणि अशोक गेहलोत हे खरगे यांचे समर्थक बनले आहेत. खरगे हे निवडणूक लढवत असल्याने ते गांधी घराण्याची निवड असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी खरगे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची खूर्ची कोणाला मिळणार? 

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधींनी माझं म्हणणं ऐकलं. राजस्थानमध्ये जो घटनाक्रम झाला त्यावर आम्हा दोघांमध्ये चर्चा झाली, असं सचिन पायलट यांनी सांगितलं. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर उत्तर देताना मी माझी भावना काँग्रेस अध्यक्षांपर्यंत पोहोचवली आहे, आता त्याच याबाबतचा निर्णय घेतील, असं सचिन पायलट म्हणाले.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; या कारणामुळे 67 पॉर्न वेबसाइट्सवर बंदी

इंटरनेटचा मागील काही वर्षात जसजसा वेगाने प्रसार झाला, तसा माहितीचा महापूर आला. स्मार्टफोन घराघरात पोहचले, व मनोरंजनाची सर्व साधने एका क्लिकवर स्मार्टफोनवर उपलब्ध झालीत. इंटरनेटवर विविध विषयांशी निगडीत वेबसाइट मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या. त्यात पॉर्न वेबसाइटचासुद्धा समावेश होता. त्यावरुन पॉर्न वेबसाइटवरील नियमनासंदर्भात सातत्याने चर्चा होत असते. अशातच याबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने पुणे न्यायालयाच्या आदेशाचं व नवीन माहिती तंत्रज्ञान नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल 67 पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना दिलेत. याबाबत ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय. केंद्र सरकारने 2021 मध्ये जारी केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांचे आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 67 पॉर्न वेबसाइट ब्लॉक करण्याचे सांगितले आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 आजपासून सुरू 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आज(शुक्रवार) स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 चा शुभारंभ झाला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी याबाबत थोडक्यात माहिती दिली.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले “स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 याची आज सुरुवात झाली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत साडेबारा हजार कोटी रुपायांचा एक मोठा आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व शहरांमध्ये स्वच्छता, नवीन सार्वजनिक शौचालयांची निर्मिती, सर्व प्रकारच्या घनकचऱ्याची प्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया असे सर्व कार्यक्रम खूप मोठ्याप्रमाणावर होणार आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. स्वच्छ शहरं तयार करण्यासाठी एक नवीन पाऊल आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने उचललं आहे.”

अफगाणिस्तान : 100 विद्यार्थ्यांच्या उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या; हात-पाय एकत्र केले, शिक्षकाने सांगितलं ते भयंकर दृश्य

अफगणिस्तानातील काबुल शहरातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. काबुलच्या शिया भागातील एका कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात तब्बल 100 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या भागात अधिकतर अफगणिस्तानातील अल्पसंख्यक शिया समुदायाचे लोक राहतात.

ज्या कोचिंग सेंटरमध्ये बॉम्ब स्फोट झाला त्याचं नाव ‘काज हायर एजुकेशनल सेंटर’ आहे. येथे विद्यार्थ्यांची कॉलेजात प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली जाते. या बॉम्बस्फोटानंतर येथील शिक्षकाने घडलेला प्रकार सांगितला.

‘बीएसएनएल’ देशभरात सुरू करणार ‘४जी’ सेवा

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही केंद्र सरकारची दूरसंचार कंपनी बंद करण्याच्या किंवा खासगीकरण करण्याच्या चर्चेला जोर चढला असताच केंद्र सरकार ‘बीएसएनएल’ला २८ हजार कोटींची मदत करणार असून देशभरात लवकरच ‘४जी’ सेवा सुरू होणार असल्याची माहिती महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.‘बीएसएनएल’ १ ऑक्टोबरला आपला २३ वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. संस्थेचा गौरवशाली इतिहास असला तरी घटती ग्राहकसंख्या, वाढता खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा ताळमेळ राखता न आल्याने ‘बीएसएनएल’ आपल्या अखेरच्या घटका मोजते आहे. त्यामुळे ती बंद होण्याच्या चर्चाही होत्या.

राष्ट्रीय  क्रीडा  स्पर्धा : पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेसारख्या युवा क्रीडा उत्सवांमधून भावी ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास या उद्घाटन सोहळय़ादरम्यान पंतप्रधानांनी व्यक्त केला.मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळय़ात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. त्यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग यांचीही या सोहळय़ाला उपस्थिती होती. या सोहळय़ात गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला असला, तरी काही क्रीडाप्रकारांना यापूर्वीच सुरुवात झाली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.