आज दि.१३ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सर्वाधिक बोली मिळाल्यानंतर स्मृती मानधनाने केला जल्लोष

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत सुरु असलेल्या या लिलाव प्रक्रियेत स्टार खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायजीमध्ये चढाओढ सुरु आहे. अशातच भारताची स्टार क्रिकेटर  स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केलं.

लिलावाची सुरुवात स्मृतीपासून झाली. मुंबईने पहिल्यांदा स्मृतीसाठी बोली लावली, परंतु अखेर आरसीबीने लिलाव जिंकून तिला आपल्या गोटात समाविष्ट केले. महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बोली मिळाल्यानंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या स्मृती मानधनाने जल्लोष केला.

‘सकाळचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करून’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं धक्कातंत्र पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत अजित पवार अजूनही त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडत नाहीत, पण देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. टीव्ही-9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

WPLमध्ये स्मृती मालामाल अन् पाकचा कर्णधार बाबर आझम झाला ट्रोल

महिली प्रीमियर लीगमध्ये आय़पीएलच्या तीन संघांनी भाग घेतला आहे. यात आरसीबीचा समावेश आहे. लिलावात आरसीबीने स्टार बॅटर स्मृती मानधनाला ३.४० कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. सध्या पाकिस्तान प्रीमियर लीगही सुरू असून त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमला मिळालेल्या किमतीच्या दुप्पट बोली स्मृतीला लावण्यात आली होती. आता यावरून बाबर आजम आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ट्रोल होत आहे.

स्मृती मानधनाची बेस प्राइज ५० लाख रुपये होती आणि तिच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली होती. पण अखेरीस ३.४० कोटी रुपयांना आरसीबीने तिला आपल्या संघात घेतलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची पाकिस्तान सुपर लीगमध्ये असलेली सॅलरी १.२४ कोटी इतकी आहे. तर स्मृतीला ३.४० कोटी रुपये इतकी बोली लागली. बाबर आजमपेक्षा स्मृतीला मिळालेली किंमत ही दुपटीपेक्षा जास्त आहे.

आता 3.5 तासांत गाठता दिल्ली, सुपरफास्ट प्रवासासाठी Mumbai-Delhi Expressway च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

बहुप्रतिक्षित दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचं आज (13 फेब्रुवारी) उदघाटन झालं. 12 हजार 150 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दिल्ली-लालसोत-दौसा या मार्गाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

महाराष्ट्र हे भारताचं विकास इंजिन; सेवा, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर विकास करणार – देवेंद्र फडणवीस

“महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या जीडीपीच्या १५ टक्के जीडीपी आपण महाराष्ट्रातून देतो. २० टक्क्यांपेक्षा जास्त निर्यात महाराष्ट्रातून होते. सगळ्याच सेक्टरमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातील जवळपास ३८ टक्के एफडीआय हा महाराष्ट्रात येतो. अतिशय प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहीलं जातं. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 च्या कार्यक्रमात ते बोलत होते.”

यावेळी फडणवीस म्हणाले, “पुढील काळात ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हिजन देशाला ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याचं आहे. देशाची अर्थव्यवस्था ही ५ ट्रिलियन डॉलरची करायीच असेल, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही आपल्याला १ ट्रिलियन डॉलरची करावी लागेल. त्याच दृष्टिने आमचं सरकार हे अर्थव्यवस्थेच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये सेवा, उद्योग किंवा कृषी क्षेत्र असो या तिन्ही क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक, सुधारणा, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यांच्या आधारावर एक वेगवान अशा प्रकारची विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”

Turkey Earthquake चा अंदाज वर्तवणाऱ्या संशोधकाचा भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तानला मोठा इशारा

टर्कीमध्ये महाप्रलयकारी भूकंपाने जगाला मोठा हादरा बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाच्या तीन दिवस आधी नेदरलँडमधील एका संशोधकाने महाप्रलयकारी भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी आता भारतासह, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपासच्या प्रदेशात भूकंपाचे मोठं धक्के बसतील असा अंदाज वर्तवला आहे.

फ्रँक हूगरबीट्स यांनी टर्कीमध्ये ७.५ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. परंतु त्यांना कोणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. तीन दिवसांनी टर्की आणि सीरियात विध्वंसकारी भूकंप आल्यानंतर सर्वांना हूगरबीट्स यांची आठवण झाली. हूगरबीट्स यांनी आज तकशी बोलताना सांगितलं की, ते ग्रहांच्या हालचालींच्या आधारावर भूकंपाची भविष्यवाणी करतात. तसेच ते सोलार सिस्टिम ज्योमेट्री सर्वेसाठी (SSGEOS) काम करत आहेत. SSGEOS ही एक संशोधन संस्था आहे जी भूकंपाबद्दलची माहिती घेण्यासाठी खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करते.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.