आज दि.२५ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

देशाला मिळाल्या नव्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी घडवला इतिहास

देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 जुलै) शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असून, प्रतिभाताई पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. तसंच, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. त्याशिवाय त्या सर्वांत कमी वयात भारताचं राष्ट्रपतिपद मिळालेली व्यक्तीही ठरल्या आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करून शिकल्या, स्वतः शिक्षिका बनल्या. त्यानंतर राजकारणात आल्या. पती, तसंच मुलांच्या निधनाचं दुःख पचवून त्या वाटचाल करत राहिल्या. आज त्या देशाच्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं. या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार आदी उपस्थित होते.

लवकरच भारतीय करू शकणार अंतराळाची सफर! केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

आता लवकरच भारतातूनअंतराळ पर्यटन म्हणजेच स्पेस टुरिझम शक्य होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी (24 जुलै 22) सांगितले. ते म्हणाले, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत मानवी अंतराळ उड्डाण क्षमतेचे प्रात्यक्षिक करून अंतराळ पर्यटनासाठी स्वदेशी क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया करत आहे. स्पेस टुरिझम सध्या खूप महाग आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अमेरिकन कंपनी Axiom Space ने 3 व्यावसायिकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची सफर घडवून आणली होती. रिपोर्टनुसार त्यावेळी एका व्यावसायिकांकडून सुमारे 420 कोटी रुपये घेण्यात आले होते.राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरने स्पेस टुरिझमच्या समावेशासह या उपक्रमांमध्ये प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रोने अंतराळातील विविध क्षेत्रात 61 देशांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संबंध पुढे नेले आहेत, असे अंतराळातील व्यवहारांसंबंधी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले.

सांगली : शिवसेनेतील गटबाजी गेली मारहाणीपर्यंत; 8 जणांकडून सेना नगरसेविकेच्या पतीला मारहाण

इस्लामपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील शिवसेना नगरसेविकेच्या पतीस मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवकुमार दिनकर शिंदे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. सात ते आठ जणांनी त्यांना मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे गटातील सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी शिंदेनी केला आहे.  शिंदे गटात सामील का होत नाही, असं विचारत त्यांना मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जखमी शिंदेवर भारती हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार केले जात आहे.

शेकडो गायींना जीवदान देणारे नाशिकचे पुरुषोत्तम, 9 वर्षांपासून सुरू आहे कार्य

अनेक शहरांमध्ये भाकड पशूंचा प्रश्न मोठा आहे. शहरातील रस्त्यांवर हे प्राणी फिरत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर वाहनांशी धडक झाल्यानं हे प्राणी देखील दगावतात. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींची अवस्था देखील वेगळी नाही. नाशिकमधील गायींची परिस्थिती पाहून पुरूषोत्तम आव्हाड  हे तरूण व्यथित झाले. त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला. आता गेल्या 9 वर्षांपासून गोमातेची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद घेऊन त्यांनी शेकडो गायींना जीवदान दिले आहे.शहरात किंवा शहराच्या बाहेर,ग्रामीण भागात बेवारस गायी,जखमी किंवा वयोवृध्द अवस्थेत आढळल्यास पुरुषोत्तम आव्हाड यांना संपर्क करा,त्यांचा फोन नंबर आहे.9028175817 या नंबरवर संपर्क करून माहिती द्या..तात्काळ मदत मिळेल,मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्ट (गोशाळा) रामशेज किल्ल्याचा पायथ्याशी संपर्क करावा असं आव्हान आव्हाड यांनी केलं आहे.

मेट्रोच्या कामांमुळे आरे रस्ता 24 तासांसाठी बंद

आज रात्री 12 पासून आरे रस्ता 24 तासांसाठी तात्पुरता बंद राहणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना दिली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे सुरू असलेल्या विविध कामांमुळे आरे रस्त्यावरील वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई पोलिसांनी ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. “MMRC आणि MCGM द्वारे चालू असलेल्या कामांमुळे आरे रोड आज रात्री 00.01 ते 24.00 वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी तात्पुरता प्रतिबंधित करण्यात आला आहे. कृपया पवई/मरोळला जाण्यासाठी JVLR चा वापर करा”, असं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे.

पुणे, अमरावती, परभणीसह राज्यातील पासपोर्ट केंद्रांतील सर्व्हर डाऊन; नागरिकांना मनस्ताप

आज सकाळपासून राज्यातील विविध पासपोर्ट केंद्रामध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळं कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळं पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट केंद्रांवर आलेल्या हजारो नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत राहावं लागलं आहे. पुणे, अमरावती, परभणीसहराज्यातील काही पासपोर्ट केंद्रामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे गोंधळ उडाला. पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना याची कोणतीही सूचना न दिल्यानं नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युतीची चर्चा झाली होती का? दीपक केसरकरांचा ‘मातोश्री’ला थेट सवाल

शिवसेनेमध्ये बंडखोरी पुकारल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, अजूनही शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरूच आहे. आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार असे आश्वासन दिले होते का? असा प्रश्नच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. तसंच, पंतप्रधान मोदींसोबत युतीची चर्चा झाली होती का? असा सवालही केसरकरांनी विचारला.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टिझर आल्यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न थेट शिवसेनेला विचारले आहे.

लोकसभेत गोंधळ घातल्यावरुन अध्यक्षांची मोठी कारवाई; काँग्रेसच्या 4 खासदारांचं निलंबन

लोकसभेत गोंधळ घातल्याच्या कारणास्तव लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या खासदारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. अध्यक्षांनी काँग्रेसच्या 4 खासदारांवर कारवाई केली असून त्यांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये मन्नीकम टागोर, ज्योति मनी, टीएन प्रतापन आणि राम्या हरिदास यांचा समावेश आहे.खासदार अध्यक्षांनी मनाई केल्यानंतरही प्लेकार्ड दाखवित विरोध करीत होते. यानंतर लोकसभेचे कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. सभागृहात गदारोळ आणि घोषणा फलक झलकवल्या बद्दल त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.