भारताचा तारांकित फलंदाज आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली तसेच, सूर्यकुमार यादवला ‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२२च्या सर्वोत्तम संघात स्थान मिळाले आहे. कोहलीने स्पर्धेत ९८.६६च्या सरासरीने २९६ धावा केल्या. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी करत आपल्या मोहिमेची सुरुवात केली, ज्यामध्ये भारताने हा सामना चार गडी राखून जिंकला. कोहलीने यानंतर बांगलादेशविरुद्ध नाबाद ६४, नेदरलँड्सविरुद्ध नाबाद ६२ आणि इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामन्यात ५० धावा केल्या.
भारताचा सूर्यकुमार (२३९ धावा) स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमारने तीन अर्धशतकी खेळी केल्या. त्याने नेदरलँड्सविरुद्ध सिडनीमध्ये नाबाद ५१, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थमध्ये ६८ आणि झिम्बाब्वेविरुद्ध मेलबर्नमध्ये २५ चेंडूंत नाबाद ६१ धावांची खेळी केली. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला १२वा खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.इंग्लंडच्या जेतेपदानंतर ‘आयसीसी’ने आपल्या निवेदनात म्हटले की, ‘‘सहा संघांतील खेळाडूंना ‘आयसीसी’ पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२२च्या सर्वोत्तम संघात सहभागी करून घेण्यात आले आहे.’’
संघ : अॅलेक्स हेल्स, जोस बटलर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, शादाब खान, सॅम करन, आनरिख नॉर्किए, मार्क वूड, शाहीन शाह आफ्रिदी, हार्दिक पंडय़ा (१२वा खेळाडू)