राज ठाकरे यांनी ‘झी 24 तास’ वृत्तवाहिनीला रोखठोक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्याच्या सध्याच्या घडामोडींवर आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांना शिंदे गटाला मनसेत सामील करुन घ्याल का किंवा विलीन केलं तर चालेल का? अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी आपण त्याबद्दल विचार करु, असं स्पष्ट उत्तर दिलं. याचा अर्थ राज ठाकरे शिंदे गटाला मनसेत समाविष्ट करुन घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं चित्र आहे.
राज ठाकरे यांनी या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. “तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं, विश्वास ठेवण्यासारखं काही नाहीय. मला त्या बाकिच्या लोकांबद्दल वाईट वाटतंय. पण हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाहीय”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. आख्ख्या देशाला, महाराष्ट्राला माहिती नाही, इतक्या जवळून उद्धव ठाकरे आपल्या माहिती असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
“असुरक्षित माणसं कधी प्रगती करु शकत नाही. ते कधी त्याच्या खांद्यावर, कधी ह्याच्या खांद्यावर प्रवास करत असतात. पण एकदा का कुणी खाली उतरवलं की त्यांची जागा त्यांना कळते. महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव जरी माझा होता, तरी मी आज पस्तावत नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची होती, सेना म्हणजे बाळासाहेबांचं अपत्य आहे. त्या संपूर्ण काळात बाळासाहेबांच्या मनात काय चालू होतं, हे मला जाणवत होतं. राजकारणात ठराविक गोष्टी सांगितलेल्या लोकांना पटत नाहीत. पण तेव्हाही शिवसेनेचं प्रमुख व्हावं, शिवसेना अध्यक्ष व्हावं, असं माझ्या मनात कधीच नव्हतं. दरम्यान मी बाळासाहेबांना अनेक पत्र लिहिलं आणि त्यातून एकच प्रश्न विचारायचो, माझा जॉब काय….?”, असं राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले.