महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच अंदाज नाही. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी अचानक मोठा राजकीय भूकंप घडला. त्यानंतर एकामागेएक वेगाने घडामोडी घडत गेल्या आणि राज्यात थेट सत्तांतर झालं. या घडामोडींनंतरही महाराष्ट्रातील राजकारण संपलंय असं नाही. कारण नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विविध चर्चा सुरु आहेत. पण या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका वेगळ्या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
“सध्याची परिस्थिती पाहता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच येत्या 3 महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लगेचच आमदारकीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे”, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी जुन्नरमध्ये केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.
2024 नंतरचा काळ हा युवकांचा आहे. युवकांचे दिवस आले कि निर्णय सुद्धा आपण घेणार. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार असल्याचे आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्तेच्या राजकारणाची गणितं जुन्या नाही तर तरुणांच्या हाती येणार असल्याचे संकेतच भर सभेत रोहित पवारांनी यावेळी दिले.
यावेळी तरुणांच्या हातात सत्तेची गणितं आणि निर्णय हे असेलच यासाठी शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शन करतील हेही सांगायला रोहित पवार विसरले नाही.