कुणाल गांजावाला यांनी आपल्या गांजावाला या आडनावा बद्दल एकदा सांगितले होते की ब्रिटिशांच्या काळात त्यांचे पूर्वज अफू-गांजाच्या व्यवसाय करीत. म्हणून गांजावाला हे आडनाव पडले. कुणाल गांजावाला यांचे मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेज मध्ये महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यांना खरे तर चार्टेड अकाउंटेंट व अभिनेता व्हायचे होते, पण कॉलेजमध्ये एकदा ते शीळ घालत असताना त्यांच्या सिनिअर विद्यार्थ्यांनी त्याला ऐकले, जबरदस्तीने कुणाल गांजावाला यांच्याकडून गाणे म्हणून घेतले आणि स्पर्धेत त्यांना मुकेशचे ”इक दिन बिक जाएगा माती के मोल” गाणे गायला लावले. कुणाल गांजावाला, पूर्णिमा उर्फ सुषमा श्रेष्ठ या गायिकेला फार मानतात, कारण त्यांनी त्यांचा आवाज ऐकून गाण्यातच करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. संजय लीला भन्साली आणि कुणाल यांचे हे एकमेकांच्या नात्यात आहेत. कुणाल गांजावाला यांनी आपले करियर २००२ मध्ये आलेल्या ‘अब के बरस से’ या चित्रपटापासून केली. भीगे होंठ हे ‘मर्डर’ सिनेमातील अनु मलीक यांनी २००३ मध्ये स्वरबद्ध केलेले गाणे. अनु मलीक यांनी त्यांना सांगितले होते या गाण्यानंतर तुझे आयुष्य बदलेल. ते शब्द अक्षरश: खरे ठरले. या गाण्यानेच कुणाल गांजावाला प्रसिद्ध झाले आणि पुढे त्यांना अनेक गाणी मिळाली. कुणाल गांजावाला हे गुजराथी असून ते हिंदी बरोबरच गुजराथी, कन्नड, मराठी, बंगाली मध्ये गायन करतात. २००५ मध्ये कन्नड फिल्म इंडस्ट्रीत ‘आकाश’ या चित्रपटात गाणी गाऊन पाऊल ठेवले. १०० हून अधिक गाणी त्यांनी कन्नड चित्रपटात गायली आहेत. कुणाल गांजावालाचे सलाम नमस्ते, सावंरीया, पानिपत, क्रिश, चीनी कम है चीनी, भागम भाग हे काही हिंदी चित्रपट होत. कुणाल गांजावाला यांनी गायिका गीता अय्यर यांच्या बरोबर लग्न केले आहे.
संजीव वेलणकर ,पुणे